सामुहिक प्रतिकारशक्ती (Herd Immunity)

सामुहिक प्रतिकारशक्ती (Herd Immunity)

COVID-19 च्या महाभीषण संकटामुळे आपल्याला अनेक शब्दांचा नव्याने परिचय झाला. जसे की-लॉकडाऊन, क्वारंटाइन, इत्यादी. त्यापैकीच एक शब्द म्हणजे ‘हर्ड इम्युनिटी’. मुंबई सारख्या जास्त घनता असलेल्या दाटीवाटीच्या वस्तीमध्ये अधिकांश लोक करोनामुळे बाधित झाले आहेत. याचाच परिणाम म्हणून त्या ठिकाणी सामूहिक प्रतिकार शक्ती (Herd Immunity) निर्माण झाली असल्याचे मत अनेक आरोग्यतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

‘सामूहिक प्रतिकारशक्ती’ म्हणजे काय?

  • ज्यावेळी लोकसंख्येची पुरेशी टक्केवारी लसीकरण किंवा आधीच्या संक्रमणाद्वारे रोगाचा संसर्ग होण्यास स्वत:मध्ये रोग प्रतिकारशक्ती निर्माण करते, अशा वेळी रोग प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या व्यक्तींना संक्रमणाची भीती कमी असते, यास सामूहिक प्रतिकारशक्ती असे म्हणतात.
  • सामूहिक प्रतिकारशक्ती हा संसर्गजन्य रोगाविरुद्ध मानवी शरीरात तयार होणारा अप्रत्यक्ष संरक्षणाचा एक प्रकार आहे.

मुंबईतील काही भागांमध्ये ‘सामूहिक प्रतिकारशक्ती’ विकसित :

  • करोना रोगाच्या सुरुवातीच्या काळात रुग्णांचा आढळदर हा एक-दोन हजारांवरून सप्टेंबरमध्ये 15 हजारांवर गेला. (दर आठवडी)
  • ऑक्‍टोबरपासून मुंबईमधील हा दर कमी होऊ लागला आणि दर आठवड्याला नव्याने चार हजारापर्यंत रुग्ण सापडत आहेत तसेच मृत्यूदरातही घसरण झाली आहे.
  • ज्या भागात संसर्गाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाला नाही त्या भागांमध्येच आता नवीन रुग्ण आढळत आहेत.
  • चाचण्यांमध्ये वाढ आणि लोकांची जास्त वर्दळ असूनही त्या तुलनेत मुंबईतील दाटवस्तीच्या भागात रुग्णसंख्या वाढलेली दिसत नाही.
  • सुरुवातीच्या काळात झोपडपट्टी भागात 70% तर बिगर-झोपडपट्टी भागात 16% लोक बाधित झाले होते. परंतु आता शहरातील बिगर झोपडपट्टी भागात नव्याने रुग्ण सापडत आहेत.
  • वरील सर्व गोष्टींमुळे मुंबईमधील लोकांमध्ये सामूहिक प्रतिकारशक्ती तयार झाल्याचे अनेक तज्ज्ञ ठामपणे सांगत आहेत.
  • मोठ्या प्रमाणात लोक करोनाबाधित झाल्यामुळे हर्ड इम्युनिटी तयार झाल्याने नव्याने बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. धारावी, वरळी अशा दाटीवाटीच्या भागात 70 ते 80 टक्के व्यक्तींमध्ये अँटीबॉडी तयार झाल्या आहेत.
  • त्यामुळे जरी करोनाच्या संकरित विषाणूचा प्रादुर्भाव वाढला तरीही हर्ड इम्युनिटीमुळे रुग्णसंख्या ही पूर्वीइतका उच्चांक गाठणार नाही.

भारतातील करोना प्रादुर्भावाबद्दल वैज्ञानिकांचे मत :

  • संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे.
  • पहिल्या लाटेत अनेकांना संसर्ग झाल्याने लोकांमध्ये प्रतिकारशक्ती विकसित झाली आहे.
  • भारतातील 30% लोकांना संसर्ग होऊन गेला असावा.
  • संसर्ग झाला असो किंवा नसो लस घ्यावी लागेल.

मानवी रोगप्रतिकारशक्ती – 

  • कोणताही जंतूसंसर्ग तसेच ॲलर्जी यांच्यापासून स्वत:च्या शरीराचे संरक्षण करण्याची क्षमता म्हणजेच रोग प्रतिकारक शक्ती होय. रोगप्रतिकारक शक्तीचे प्रामुख्याने खालील प्रकार पडतात.
  1. जन्मत: असणारी प्रतिकारक शक्ती (Innate Immunity)
  2. प्राप्त केलेली प्रतिकारक शक्ती (Acquired Immunity)
  3. प्रत्यक्ष रोगप्रतिकारक शक्ती
  4. अप्रत्यक्ष रोगप्रतिकारक शक्ती

जन्मत: असणारी प्रतिकारक शक्ती – यामध्ये मानवात विविध प्रकारचे बॅरियर्स जन्मापासूनच असतात, त्याद्वारे सहवासात येणाऱ्या जंतू, विषाणूंशी आपले शरीर सामना करते. उदा. मानवी त्वचा, पोटातील आम्ल, तोंडातील लाळ, डोळ्यातील अश्रू, शरीरातील पांढऱ्या पेशी (WBC) इत्यादी

प्राप्त होणारी प्रतिकारक शक्ती – जेव्हा आपले शरीर पहिल्या वेळी एखाद्या रोगास बळी पडते तेव्हा त्याची माहिती शरीरातील अँटीबॉडीज लक्षात ठेवतात आणि दुसऱ्या वेळी या रोगापासून संरक्षण करतात. यामध्ये रक्तामधील ‘बी-लिंपोसाइट आणि टी-लिंपोसाइट’ या दान पेशी महत्वाची भूमिका बजावतात.

प्रत्यक्ष प्रतिकार शक्ती – एखाद्या रोगास बळी पडल्यानंतर मानवी शरीर स्वत: त्या रोगाविरुद्ध प्रतिपिंडे (Antybodies) निर्माण करते, तेव्हा त्यास प्रत्यक्ष प्रतिकारक शक्ती असे म्हणतात.

अप्रत्यक्ष प्रतिकारक शक्ती – जेव्हा प्रयोगशाळेत तयार केलेल्या अँटीबॉडीज लसीच्या माध्यमातून मानवी शरीरात पुरवून एखाद्या रोगाचा सामना केला जातो, तेव्हा त्यास अप्रत्यक्ष प्रतिकारक शक्ती असे म्हणतात.

Contact Us

    Enquire Now