महाराष्ट्रातील अलिबागचा पांढरा कांदा व वाडा-कोलम तांदळास जीआय मानांकन

महाराष्ट्रातील अलिबागचा पांढरा कांदा व वाडा-कोलम तांदळास जीआय मानांकन

  • नुकतेच महाराष्ट्रातील औषधी गुणधर्म असलेल्या अलिबागच्या पांढऱ्या कांद्यास व पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात पिकविल्या जाणाऱ्या तांदळाच्या ‘वाडा कोलम’ जातीस जीआय मानांकन प्राप्त झाले आहे.

अ) अलिबागचा पांढरा कांदा

  • या कांद्याच्या लागवडीचे ऐतिहासिक दाखले १८८३ च्या कुलाबा गॅझेटमध्ये भेटतात.
  • १५ जानेवारी २०१९ ला यास जीआय मानांकन मिळावे यासाठी नोंदणी करण्यात आली होती.
  • लागवड : भात कापणीनंतर जमिनीतील ओलावा दोन महिने टिकून असतो, त्यामुळे शेतकरी ह्या कांद्याची सेंद्रीय पद्धतीने पारंपरिक बियाणांचा वापर करून लागवड करतात.
  • पीक कालावधी : साधारणत: अडीच महिने
  • विक्री : हा कांदा उन्हाळ्यातील दोन ते तीन महिनेच बाजारात विक्रीसाठी असतो. स्थानिक महिला विशिष्ट पद्धतीने या कांद्याच्या माळा विणतात आणि नंतर आकारमानानुसार विणलेल्या कांद्याच्या माळा बाजारात विक्रीसाठी पाठवल्या जातात.

औषधी गुणधर्म :

१) पांढऱ्या कांद्यात मिथाईल सल्फाइड आणि अमिनो ॲसिड असते, जे शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवते व हृदयाच्या समस्याही कमी करते.

२) या कांद्याचे रोज सेवन केल्याने रक्ताची कमतरता दूर होते.

३) सर्दी किंवा खोकला असल्यास ताज्या कांद्याचा रस, गूळ आणि मध एकत्र करून दिले जाते.

४) मधुमेहींसाठीही हा कांदा उपयुक्त असतो.

  • यापूर्वी, लासगावच्या कांद्यासही जीआय मानांकन प्राप्त झाले आहे.

ब) वाडा कोलम :

  • पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातच कोलम जमातीद्वारा पिकविला जाणाऱ्या अत्यंत सुगंधी, मुलायम, रुचकर आणि पचनास हलका अशा वाडा कोलम तांदळाला देशासह परदेशातही मागणी असते.
  • सन १९१० पूर्वीपासून ‘तांदळाचे कोठार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाडा तालुक्यातील ग्रामीण भागात ‘झिणी’ आणि ‘सुरती’ या वाणांची लागवड केली जात असे, कालांतराने वाढत्या मागणीमुळे यांनाच ‘वाडा कोलम’ हे नाव देण्यात आले.
  • संकरित बियाणांचा अतिवापर व कमी उत्पन्न यांमुळे बनावटी तांदळाच्या विक्रीचा धोका निर्माण झाला होता.
  • त्यासाठी वाडा कोलम शेतकरी उत्पादन सहकारी संस्था मर्या. लि. आणि वाडा झिनिधसया कोलम उत्पादक सहकारी संस्था मर्या. लि. यांनी वाडा कोलमला संरक्षण मिळावे त्यामुळे यास जीआय मानांकन मिळविण्याकरिता मागील तीन वर्षांपासून प्रयत्न सुरू केले.
  • २९ सप्टेंबरला त्यासाठीच्या जीआय मानांकनास तत्त्वत: मंजुरी दर्शविण्यात आली.
  • यापूर्वी आंबेमोहोर अजारा घणसाळ या महाराष्ट्रातील तांदळाच्या जातींना जीआय मानांकन प्राप्त झाले आहे.

Contact Us

    Enquire Now