नव्या विषाणूची कुंडली

नव्या विषाणूची कुंडली

  • जनुकीय क्रमनिर्धारण हा शब्द ब्रिटनमधील नवा कोरोनामुळे आता चर्चेत आला असला तरी यापूर्वी भारतातील वीस आघाडीच्या संस्थांनी २३८ कोटी रुपयांचा जिनोम प्रकल्प राबवला होता, त्यात जनुकीय क्रमनिर्धारण तंत्र वापरण्यात आले होते.
  • या प्रकल्पात १० हजार लोकांचा जनुकीय क्रम निर्धारित करण्याचा उद्देश होता.
  • आता तेच तंत्र नवकोरोना विषाणू ओळखण्यासाठी वापरले जात आहे.

जनुकीय क्रमनिर्धारण म्हणजे काय?

  • जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सिक्वेन्सिंग) याचा अर्थ जिनोम म्हणजे जनुकसंचातील सर्व डीएनएचा अभ्यास
  • न्यूक्लिओटाइडचा क्रम यात अभ्यासला जातो. ज्यात जनुकांचाही समावेश होतो.
  • जिनॉमिक्स ही एक आंतरविद्याशाखा असून त्यात जिनोमची रचना, कार्य, क्रमवारी हे निश्चित केले जाते.
  • जिनॉमिक्समध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वाचे ठरते, त्यातून मेंदूसारख्या अतिशय गुंतागुंतीच्या जैविक अवयवांचा अभ्यास शक्य झाला आहे.
  • जनुकीय क्रमनिर्धारणाचा अर्थ डीएनएचे प्रमुख घटक असलेल्या चार प्रमुख रेणूंची क्रमवारी तपासणे – यातून व्यक्तीला कुठल्या जनुकातील बदलांमुळे विशिष्ट रोग झाला हे समजते.
  • ज्या चार रेणूंची रचना यात तपासली जाते त्यात ॲडेनाइन (ए), थायमीन (टी), सायटोसीन (सी) आणि ग्वानाइन (जी) या घटकांची क्रमवारी तपासली जाते.
  • यात ‘ए’ व ‘टी’ यांची जोडी असते त्याचप्रमाणे ‘सी’ आणि ‘जी’ यांची जोडी असते.
  • आपल्या मानवी जिनोममध्ये अशा ३ अब्ज जोड्या असतात.
  • त्यात जी माहिती असते त्यावरून माणसाची किंवा कुठल्याही घटकाची जनुकीय कुंडली मांडली जाते.
  • जनुकीय क्रमनिर्धारणाचा वापर आता नव्या विषाणूची ओळख पटवण्यासाठी होत आहे.

जनुकीय क्रमनिर्धारणाचा उपयोग काय?

  • खरेतर मानवाला कुठले रोग होण्याची शक्यता आहे हे या तंत्राने सांगता येते, पण त्याचा उपयोग आता विषाणूच्या रचनेतील फरक ओळखण्यासाठी करण्यात आला आहे.
  • जनुकीय माहितीच्या आधारे एक प्रकारे नवीन विषाणूची ओळख त्यातील प्रथिने व इतर भागातील बदलातून पटते.
  • ही ओळख पटण्यासाठी जनुकीय उत्परिवर्तने शोधली जातात. या तंत्राने रोगनिदान शक्य होते.
  • केसावरूनही मृतदेहाची ओळख या तंत्राने पटवली जाते.
  • आताच्या विषाणूच्या बाबतीत न्यूक्लिओटाईडची क्रमवारी महत्त्वाची आहे.
  • डीएनए पॉलिमरेज रेणूचे निरीक्षण सूक्ष्मदर्शक किंवा कॅमेऱ्याच्या मदतीने केले जाते. त्याूतून ही संकेतावली उलगडते.
  • नॅनोपोअरवर आधारित क्रमवारी निर्धारण ही दुसरी एक पद्धत यात आहे.
  • सँगर पद्धतीनेही क्रमनिर्धारण करता येते, ब्रिटनमधील कोरोना विषाणूत २३ उत्परिवर्तने झाली आहेत हे क्रमवारीतून दिसून आले.

भारतात जनुकीय क्रमनिर्धारण करणाऱ्या संस्था कोणत्या?

  • ब्रिटनमधून आलेल्या बाधितांचे नमुने इन्साकॉग प्रयोगशाळांकडे पाठवण्यात आले आहेत.
  • इन्साकॉगमध्ये एनआयबीएमजी – कोलकाता, आयएलएस – भुवनेश्वर, एनआयव्ही – पुणे, सीसीएस – पुणे, सीसीएमबी – हैदराबाद, सीडीएफडी – हैदराबाद, इनस्टेम – बेंगळुरू, निमहंस – बेंगळुरू, आयजीआयबी – दिल्ली, एनसीडीसी – दिल्ली यांचा समावेश आहे.

भारतातील उत्परिवर्तनाची शक्यता

  • ब्रिटनमधील नवकोरोना विषाणूबाबत खबरदारी म्हणून तेथून भारतात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी आणि अलगीकरण केले जात आहे.
  • दक्षिण आफ्रिकेत स्वतंत्रपणे आढळून आलेल्या ५०१ व्ही २ या उत्परिवर्तित विषाणूत दिसून आलेले एन ५०१ वाय हे उत्परिवर्तन ब्रिटनमधील उत्परिवर्तित कोरोनातही झाले आहे.
  • भारतात अद्याप स्पाइक एन ५०१ वाय उत्परिवर्तन आढळले नसले तरी, भारतात जुलैपासूनची पी ६८१ एच उत्परिवर्तन झालेले विषाणू आढळून आले.
  • सध्या भारतात प्रसार होत असलेल्या सार्स – सीओव्ही – २ विषाणूंपैकी १४ टक्के विषाणूंत हे उत्परिवर्तन झालेले आहे.
  • हे विषाणू प्रामुख्याने महाराष्ट्रात आढळले असून काही पश्चिम बंगालमध्ये दिसून आले.
  • या विषाणूत आणखी एक उत्परिवर्तन झाले तर ब्रिटनसारखी स्थिती भारतात उद्‌भवू शकते.
  • जगभरातच असलेला हा संभाव्य धोका ओळखून जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या प्रत्येकी ३०० होकारात्मक चाचण्यांपैकी कमीत कमी एका नमुन्याची जनुकीय क्रमवारी शोधण्याची शिफारस केली आहे.
  • ब्रिटनमध्ये हे प्रमाण होकारार्थी चाचण्यांच्या ६.२ टक्के, दक्षिण आफ्रिका आणि अमेरिकेत ०.३ टक्के तर भारतात सध्या ०.०५ टक्के आहे.

Contact Us

    Enquire Now