देशातील ७० लाख वाहने वर्षभरात भंगारात निघणार

देशातील ७० लाख वाहने वर्षभरात भंगारात निघणार

  • केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी १५ वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान असलेली व्यावसायिक वाहने भंगारात काढण्याचा निर्णय जाहीर केला होता. दरम्यान अर्थसंकल्पात याला मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे वाहतूक व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. या निर्णयाचा त्यांनी तीव्र विरोध केला आहे. कारण पहिल्याच वर्षात देशात सुमारे ७० लाख, तर महाराष्ट्रात एक लाखांहून अधिक वाहने भंगारात निघणार आहेत.
  • यासाठी ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेस आणि राज्य वाहन मालक-चालक प्रतिनिधी महासंघाने आढावा घेतला. कोरोना महामारीत आधीच मोडकळीस आलेल्या वाहतूक व्यवसायाला या निर्णयामुळे वाहतूकदारांवर कुऱ्हाड कोसळणार म्हणून वाहतूकदारांकडून याला विरोध होत आहे.
  • एप्रिल २०२२ पासून हा निर्णय लागू होणार असल्याचे अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्पात मंजुरी देताना स्पष्ट केले आहे.
  • दरम्यान वयोमर्यादेच्या या निर्णयामुळे देशातील लाखो वाहतूकदार, चालक, क्लीनर, गॅरेज चालक तेथील कामगार या वर्गावर अनिष्ट परिणाम होणार आहे. शिवाय कोरोनामुळे व्यवसाय कमी झाला, इंधनाचे वाढते दर त्यातच जुने वाहन भंगारात काढल्यानंतर नवीन वाहने खरेदी करण्यासाठी पैसे उपलब्ध असतीलच असे नाही. त्यामुळे छोटा व्यावसायिक मोडून पडणार आहे, त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करावा, अशा आशयाचे पत्र महाराष्ट्र राज्य वाहन मालक-चालक प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी अर्थमंत्री सीतारामन यांना पाठवले आहे.
  • याआधी केंद्रीय वाहतूकमंत्री गडकरी यांनी या भंगारातून ॲल्युमिनियम व वेस्टपासून वेल्थ निर्मिती करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सांगितले आहे. बायोफ्‍यूएल, सीएनजी, एलएनजी अशा पर्यावरणपूरक वेगवेगळ्या इंधनांवर स्टार्ट अप सुरू करून संशोधन करावे. यातून पेट्रोल-डिझेलला पर्याय उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले होते.

Contact Us

    Enquire Now