आसाम-मिझोराम सीमावाद

आसाम-मिझोराम सीमावाद

  • २६ जुलैला सोमवारी आसाम आणि मिझोरामच्या सीमेवर झालेल्या हिंसाचारामध्ये सुमारे सहा आसामी पोलिसांचा दुःखद मृत्यू झाला.
  • जवळपास १५०  वर्षे जुन्या असणाऱ्या सीमा वादामुळे सदर संघर्ष झाला.
  • आसाम आणि मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना शांतता प्रस्थापित करण्याची विनंती केल्यानंतर संबंधित सीमांवर परिस्थिती निवळली.
  • मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्येसुद्धा दोन वेळा अशीच घटना घडून आली होती.
  • ईशान्य भारतातील राज्यांमध्ये सीमावाद हा अनेक दशकांपासून चालू आहे.
  • एकट्या आसाम या राज्याची सीमा पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश, मिझोराम,  मणिपूर, त्रिपुरा, नागालँड आणि  मेघालय या राज्यांना लागून आहे.
  • यातील पश्चिम बंगाल, मणिपूर आणि त्रिपुरा सोडता इतर सर्व राज्यांशी आसामचा सीमा वाद चालू आहे.
  • परंतु मिझोराम सीमाप्रश्न हा यापूर्वी  कधीच हिंसेच्या मार्गाने (ऑक्टोबर २०२० वगळता)  गेला नाही.
  • आसाम – मिझोराम  सीमावादाच्या मध्यभागी १८७५ आणि मुख्यतः १९३३ मध्ये ब्रिटिश शासनाने सीमा आखण्यासाठी जाहीर केलेल्या सूचना (Notifications) आहेत.

पार्श्वभूमी : स्वातंत्र्यापूर्वी मणिपूर, त्रिपुरा आणि सिक्कीम वगळता  ईशान्य भारतातील सर्वच राज्ये  आसामचा भाग होती.

  •  १९६३ मध्ये नागालँडला भारताचे १६ वे राज्य म्हणून स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.
  •  १९७१ च्या North-Eastern Areas (Reorganisation) Act द्वारे १९७२ मध्ये मणिपूर आणि त्रिपुरा या केंद्रशासित प्रदेशांना व मेघालय या उपराज्यास  (Sub-State within Assam)  स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला आणि ती भारताची अनुक्रमे १९, २० आणि २१वी राज्ये झाली.
  •  त्याच कायद्याने वरील राज्यांसोबत अरुणाचल प्रदेश ( पूर्वीचा NEFA)  आणि मिझोराम या केंद्रशासित प्रदेशांची सुद्धा निर्मिती झाली.
  •  पुढे १९८७ मध्ये मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळून ही भारताची अनुक्रमे २३वी व २४वी राज्ये  झाली.
  •  सिक्किम, मणिपूर आणि त्रिपुरा ही सुरुवातीपासूनच आसाममध्ये नव्हती. त्यांची स्वतंत्र राज्ये (princely states)  होती. त्यामुळे आसामसोबत यांचा सीमेबाबत वाद नाही.
  •  परंतु इतर राज्ये आसाममधूनच तयार झाल्यामुळे त्यांच्यामध्ये आणि आसाममध्ये सीमाप्रश्न उद्भवतो.
  •  आसाम आणि मिझोराम एकमेकांसोबत १६४.६  किलोमीटर्स सीमेने जोडलेले आहेत.
  •  या  सीमारेषेवर आसामचे करीमगंज, हैलाकांडी आणि कच्छर (Cachar) हे जिल्हे तर मिझोरामचे ऐझवाल (Aizwal),मामीत आणि कोलासिब  हे जिल्हे आहेत.
  •  सोमवारी झालेली घटना ही आसामच्या कच्छर  जिल्ह्यातील लैलापूर आणि  मिझोरामच्या कोलासिब  जिल्ह्यातील वैरेंगते ( Vairengte) या  सीमेलगत असणाऱ्या गावांमध्ये झाली.
  •  मिझोरामचा असा आरोप आहे की आसामी पोलीस सीमा ओलांडून  मिझोराममध्ये आले  तर आसामच्या मुख्यमंत्र्यांचे असे म्हणणे आहे की त्यांच्या राज्यातील पोलिस हे मिझोराम आसामच्या सीमेमध्ये करत असलेल्या अवैध बांधकामाला थांबवण्यास सांगण्यासाठी गेले होते.
  •  स्वातंत्र्याच्या अगोदर  मिझोराम आसाममधील एक जिल्हा होता. ज्याचे नाव ‘लुशाई हिल्स’ (लुशाई  टेकड्या) असे होते.
  •  आसाममधील कच्छर जिल्हा हा  बराक व्हॅलीचा भाग असून तो सपाट असा असल्याने तेथे एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर  ब्रिटिशांनी  चहाच्या मळ्याची शेती करण्यास सुरुवात केली. या भागास कच्छर प्लेन्स (मैदान) असेही म्हणतात.
  •  १८७५ मध्ये Bengal Eastern Frontier Regulation Act, १८७३ नुसार ब्रिटिशांनी मिझो लोकांच्या नेत्यांसोबत चर्चा करून कच्छर मैदान आणि  लुशाई  टेकड्या यांना वेगळे करून त्यांच्यामध्ये सीमारेषा आखली. या सीमारेषेला  मिझोराम मान्यता देते.
  •  परंतु १९३३ मध्ये पुन्हा एक शासकीय सूचना जारी करून ब्रिटिशांनी मणिपूर आणि लुशाई  टेकड्या  यांच्यामध्ये सीमारेषा आखली. ही सीमा आखत असताना मिझोरामच्या नेत्यांना  विश्वासात घेण्यात आले नव्हते.  तसेच मिझोरामच्या राजकीय पक्ष आणि इतर गटांच्या म्हणण्यानुसार १९३३  च्या या सीमा आखणीमुळे लुशाई हिल्स मधला काही भाग हा आसाममध्ये दाखवला जातो. म्हणून मिझोराम १९३३ च्या सूचनेला मान्य न करता १८७५  त्या सूचनेस वैध मानतो. तर आसाम १९३३ मध्ये ठरवलेल्या सीमारेषेला  मान्यता देतो. संघर्षाचा मुख्य मुद्दा हाच आहे.
  •  १९८६  मध्ये मिझो नॅशनल फ्रंटच्या लालडेंगा  आणि राजीव गांधी सरकार यांच्यामध्ये मिझो शांतता करार (Mizo Peace Accord) होऊन १९८७ ला मिझोरामला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.
  •  हे करताना १९३३ची सीमारेषा  आधार मानण्यात आली होती. तेव्हापासून हा सीमावाद सतत चालू आहे. कारण  मिझो लोकांच्या म्हणण्यानुसार १८७५ ची सीमारेषा  वैध आहे.
  •  १९९४ पासून  आसाम- मिझोराम  शांततेसाठी बैठकी होत आहेत. परंतु अजून त्यावर तोडगा निघालेला नाही. सीमारेषेवर असणाऱ्या  भागावर (No Man’s Land) शांततेची परिस्थिती  जैसे थे (Status Quo)  राहावी यासाठी दोन्ही राज्यांमध्ये यापूर्वी करार झाला होता.
  •  परंतु होणाऱ्या चकमकी बघता  त्याच्या उपयुक्ततेवर प्रश्न निर्माण होतो.

इतर महत्त्वाचे :

  •  राज्यघटनेच्या  अनुच्छेद ३  नुसार राज्यांच्या सीमा ठरवण्याचा, त्यांची नावे बदलण्याचा तसेच अस्तित्वात असणाऱ्या सीमांमध्ये फेरफार करण्याचा अधिकार संसदेला आहे.
  •  याचे अलिकडील उदाहरणे म्हणजे २०१४  मधील आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा  आणि २०१९ मधील जम्मू-कश्मीर  पुनर्रचना कायदा.
  •  मणिपूर, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि मिझोराम  या राज्यांमध्ये असणाऱ्या आदिवासी संस्कृतीची जपणूक करण्यासाठी Inner Line Permit ही व्यवस्था  Bengal Eastern Frontier Regulation Act,१८७३ नुसार शासनाने केली आहे.
  •  बाहेरील राज्यांमधून या चार राज्यांमधील  संरक्षित क्षेत्रात जाण्यासाठी भारतीय नागरिकांना राज्य सरकारकडून जारी होत  असणारे Inner Line Permit घ्यावे लागते.
  •  तर बाहेरील देशातील नागरिकास Protected Areas Permit याची तरतूद आहे.
  •  महाराष्ट्राच्या बाबतीत महाराष्ट्र-कर्नाटक  सीमावादामध्ये १९४८ मध्ये स्थापन झालेली महाराष्ट्र एकीकरण समिती, १९५६ चा राज्य पुनर्रचना आयोग आणि १९६० मध्ये केंद्र शासनाने स्थापन केलेली महाजन समिती आणि  या दोन राज्यांचा इतिहास यांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो.

Contact Us

    Enquire Now