लोकसभा मुदतीआधीच अनिश्चित काळासाठी तहकूब
- पेगॅसस हेरगिरी घोटाळा, कृषी कायदा, बेरोजगारी, महागाई या मुद्द्यांवरून पावसाळी अधिवेशनात झालेल्या गदारोळामुळे लोकसभेचे अधिवेशन १३ ऑगस्ट या नियोजित तारखेच्या दोन दिवस अगोदरच तहकूब करण्यात आले.
अधिवेशनाचे फलित :
- अधिवेशनातील शून्य प्रहर व प्रश्नोत्तराचा तास अधिक प्रभावी ठरला.
- या अधिवेशनात संविधानाच्या १२७व्या सुधारणा विधेयकासह एकूण २० विधेयके मंजूर करण्यात आली, तर एकूण ६६ प्रश्नांची उत्तरे देण्यात आली.
सत्र समाप्ती :
अ) तहकूब (Adjournment):
- सभागृहाचे कामकाज काही तासांकरिता, दिवसांकरिता, वा सुट्ट्यांकरिता तहकूब करण्यात येते.
- पुन्हा एकत्र येण्याचा दिवस निश्चित न करताही सभागृह तहकूब करता येते, त्यास Adjournment sine die म्हणतात.
- सभागृहात सभापती आपल्या अधिकारांतर्गत सभागृहाची बैठक करतात.
ब) सत्रावसान (Prorogation):
- याद्वारे ठराविक कालावधीसाठी सभागृहाचे कामकाज स्थगित केले जाते, मात्र सभागृहाचे अस्तित्व राहते.
- पंतप्रधानांच्या सल्ल्यावरून राष्ट्रपती (कलम ८५ (२) (अ) अन्वये) सभागृहाचे सत्रावसान करतात.
- यामुळे सभागृहात पुढील प्रलंबित विधेयके, वा इतर कामकाज व राष्ट्रपतीची संमती या बाबी व्यपगत होत नाहीत (कलम १०७ (३) अन्वये).
क) विसर्जन (Dissolution):
- सभागृहाचा कालावधी समाप्त होणे. केवळ लोकसभा विसर्जित होते; त्यासाठी नवीन निवडणुका घेतल्या जातात.
शून्य प्रहर:
- पूर्वसूचनेशिवाय सदस्य हवा तो विषय गृहासमोर मांडू शकतो, प्रश्नोत्तरांचा तास संपताच बरोबर बाराच्या ठोक्यास ‘शून्य तास’ म्हणतात.
- संसदीय नियमांमध्ये याचा उल्लेख नाही; १९६२पासून सुरुवात.
- रवि रे आणि शिवराज पाटील या लोकसभापतींनी या संकल्पनेचा पाया घातला.
प्रश्नोत्तराचा तास :
अ) तारांकित प्रश्न:
- यासाठी किमान १० ते कमाल २१ दिवसांपूर्वी सूचना द्यावी लागते.
- एका दिवसात एक सदस्य एक प्रश्न विचारू शकतो असे जास्तीत जास्त २० प्रश्न एका दिवसात विचारता येतात.
- संबंधित मंत्री प्रश्नाचे उत्तर तोंडी स्वरूपात देतो; त्यासंबंधित उपप्रश्न विचारता येतो.
ब) अतारांकित प्रश्न:
- तारांकित प्रश्न प्रमाणेच पूर्व सूचना द्यावी लागते.
- पूरक अथवा उपप्रश्न विचारता येत नाही; प्रश्नांचे लेखी उत्तर दिले जाते.
- जास्तीत जास्त २३० प्रश्न एका दिवसात विचारता येतात.
क) अल्प सूचना प्रश्न:
- सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयासंबंधी १० दिवसांपेक्षा कमी कालावधीत पूर्वसूचना देऊन मांडता येतो.
- याचे उत्तर तोंडी स्वरूपात दिले जाते व उपप्रश्नही विचारता येतो.