वर्षभरात बालभारती स्वत:चे शैक्षणिक चॅनेल सुरू करणार
- विद्यार्थ्यांसाठी बालचित्रवाणीतील चांगले शैक्षणिक साहित्य पुनुरुज्जीवित करून त्याचा वापर केला जाणार आहे. तसेच वर्षभरात बालभारतीतर्फे स्वत:चा शैक्षणिक चॅनेल सुरू केला जाईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली.
- गेल्या दहा महिन्यांपासून कोरोना संसर्गामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या, असे असतानाही शिक्षण सुरू ठेवले. कोरोनामुळे १०वी-१२वीच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्गात बसून शिक्षण घेता आले नाही. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून १ फेब्रुवारीपासून शिक्षण विभागातर्फे फेसबुक-यू ट्यूब लाईव्हसारख्या साधनांद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व समुपदेशन केले जाणार आहे.
- या उपक्रमासाठी ४२६ तज्ज्ञ शिक्षक व ५९६ विषय तज्ज्ञांची निवड करण्यात आली आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.
- ‘बालभारती’ म्हणजेच महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ संस्थेच्या ५४व्या वर्धापनदिनानिमित्त व ‘किशोर’ मासिकाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या शुभारंभानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी वर्षा गायकवाड समवेत शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, बालभारतीचे संचालक दिनकर पाटील, कवी इंद्रजित भालेराव, आदी मान्यवर उपस्थित होते.
- सद्यपरिस्थितीत कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने ४थीचे वर्ग टप्प्याटप्याने सुरू केले जातील. विद्यार्थ्यांची शाळांमधली उपस्थिती वाढावी व शाळाबाह्य विद्यार्थी मुख्य प्रवाहात यावेत यासाठी स्वतंत्र उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे कार्यक्रम प्रसंगी गायकवाड यांनी सांगितले.
- शिक्षण विभागाने विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती व विषय तज्ज्ञ शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन करावे कारण राज्यातील अनेक शाळा आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिक्षण घेऊ शकतात. यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी शिक्षण विभागातर्फे सुसज्ज तीन स्टुडिओ उभे करण्यात आल्याची माहिती गायकवाड यांनी दिली.
- महापालिका, नगरपालिकेच्या व जिल्हा परिषदेच्या शाळेतील प्रवेशासाठी रांगा लागतात. या बाबतची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा शिक्षण विभागातर्फे प्रयत्न केला जाणार असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.
- वाचन संस्कृतीला चालना मिळावी यासाठी बालभारतीने ग्रंथालय सुरू करण्याचे आदेश शालेय शिक्षणमंत्री गायकवाड यांनी दिले. तसेच वाचकांना विशेष भेट म्हणून ‘किशोर’ मासिकाची वार्षिक वर्गणी ८० रुपयावरून केवळ ५० रुपये करण्यात आली असल्याची घोषणा त्यांनी केली.