
राज्य सरकारकडून ‘कोरोनामुक्त गाव स्पर्धे’चे आयोजन
- ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्राेत्साहन मिळावे आणि गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावी यासाठी राज्य सरकारने ‘कोरोनामुक्त गाव स्पर्धा’ आयोजित केल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.
- गावच्या वेशीवरच कोरोनाला रोखलेल्या गावांचा गौरव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी साधताना केला. या उपक्रमास आता अधिक चालना देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
- या स्पर्धेत भाग घेणाऱ्या गावांचे विविध २२ निकषांवर गुणांकन करण्यात येणार आहे. यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
- प्रत्येक महसूल विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख रुपये, २५ लाख रुपये व १५ लाख रुपये याप्रमाणे कोरोनामुक्त गाव स्पर्धा बक्षीस दिले जाणार आहे. सहा महसुली विभागात प्रत्येकी तीन याप्रमाणे राज्यात एकूण १८ बक्षिसे दिली जाणार आहेत. यासाठी बक्षिसांची एकूण रक्कम ५ कोटी ४० लाख रुपये असेल.
- राज्यात प्रत्येक ग्रामपंचायतीने कोरोनामुक्तीसाठी ग्रामपंचायत स्तरावर पाच पथकांची स्थापना करावी आणि त्यांच्यामार्फत विविध उपक्रम राबवायचे आहेत. यामध्ये विलगीकरण कक्ष, प्रभागनिहाय कुटुंबनिहाय सर्वेक्षण पथक स्थापन करून त्यासाठी कार्यवाही पथक, कोरोना तपासणीसाठी व रुग्णांना रुग्णालयात भरती करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या वाहनचालकांचे पथक, लसीकरण पथक आणि ‘कोविड हेल्पलाइन’ पथक आदींचा समावेश असेल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी दिली.
- बाधितांचा संपर्क शोधून रुग्णालयात दाखल करण्याची तत्परता, प्रतिजन चाचणी (Antigen Test) सुविधा, विलगीकरण व्यवस्था, कोरोनामुक्त समिती पथके, रुग्णांसाठी वाहतूक सुविधा, बाधित शेतकऱ्यांच्या घरातील शेतमालाचा स्वयंसेवकांमार्फत पुरवठा, लसीकरण सुलभ होण्यासाठी योजना, कोरोनामुळे आधार हरपलेल्या कुटुंबातील सांभाळ, जनजागृती, आदी २२ निकषांवर सहभागी गावांचे गुणांकन करण्यात येईल.
- या कोरोनामुक्त गावस्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या तीन ग्रामपंचायतींना याशिवाय लेखाशीर्ष पंचवीस-पंधरा (२५१५) व तीस-चोपन्न (३०५४) या योजनांमध्ये प्राधान्य देऊन अनुक्रमे ५० लाख, २५ लाख व १५ लाख रुपयांची विकासकामेही मंजूर केली जाणार आहेत.
- एकंदरीतच जी गावे कोरोनापासून पूर्णपणे मुक्त असतील अशा गावांना ५० लाख रुपये तसेच ५० लाख रुपयांची विकास कामे असे एक कोटीचे बक्षीस देण्यात येणार आहे. ही योजना मार्च २०२२ पर्यंत सुरू राहणार आहे.