राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नियुक्ती
- गडकिल्ल्यांचे जतन व संवर्धन करण्याच्या कामाच्या तसेच त्या परिसरातील पर्यटनासाठी सुविधा निर्माण करणे, परिसराची जैवविविधता जतन करणे, वनीकरण करणे या कामांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली एकूण २४ सदस्यांची सुकाणू समिती नियुक्त करण्यात आली आहे.
- या समितीमध्ये खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांचा विशेष आमंत्रित सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. किल्ल्यांचे जतन व संवर्धन संदर्भात कामाच्या प्रगतीचा आढावा घेऊन मुख्यमंत्री सचिवालयातील संकल्प कक्षामार्फत पाठपुरावा करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच २५० दुर्गप्रेमी आणि गिर्यारोहक यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता. त्यानुसार ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही सुकाणू समिती जाहीर करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार हे समितीचे उपाध्यक्ष असतील.
- चालू आर्थिक वर्षात पहिल्या टप्प्यात शिवनेरी, राजगड, तोरणा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग आणि सुधागड या सहा किल्ल्यांचे संवर्धन करण्यात येणार आहे.
- उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री, पर्यटनमंत्री आणि विविध विभागांच्या सचिवांसह आदेश बांदेकर हे या समितीचे सदस्य आहेत. तर मिलिंद गुणाजी, ऋषिकेश यादव, नितीन बानगुडे पाटील, माधव फडके, उमेश झिरपे यांची आमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- सांस्कृतिक खात्याचे सचिव हे या समितीचे सदस्य सचिव असतील. गडकिल्ल्यांचे जतन आणि संवर्धनाचे काम, त्यांचे पावित्र्य जपत, त्यांचा ऐतिहासिक वारसा आणि पुरातत्त्व वारशाला कोणताही धक्का लागणार नाही, याची खबरदारी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ही समिती घेईल.
- हेलिकॉप्टरच्या साहाय्याने गडकिल्ल्यांच्या परिसरात बिया टाकून नैसर्गिकरीत्या या भागात वनराई विकसित करणे तसेच वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
- तसेच या गडकिल्ल्यांच्या आजुबाजूला असलेल्या ५० कि. मी. अंतरावर असलेली पर्यटनस्थळे, साहसी खेळ, गिर्यारोहण, किल्ल्यांचे ऐतिहासिक संदर्भ, तिथे घडलेला पराक्रम, तिथले वन्यजीव, वनसंपदा, जैवविविधता जोपासत आजुबाजूची लोकपरंपरा, गडाच्या अनुषंगाने काही लढाया आल्या असतील तर त्या; या सगळ्या गोष्टींची माहिती संकलित करून गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावात पर्यटन केंद्र विकसित करणे, मूळ गडाची प्रतिकृती तयार करणे, पूर्वीचे ऐतिहासिक वातावरण निर्माण करणे, लाइट ॲण्ड साऊंड शो दाखविणे, याबाबत सर्वंकष विकास आराखडा संबंधित यंत्रणांमार्फत मागवून पर्यटन विभागाला संनियंत्रण समितीला सादर करावा लागणार आहे.
- या भागात पर्यटनाच्या विविध सुविधा उपलब्ध करून पर्यटन केंद्र उभारण्यात येतील. जैवविविधता जपत गडकिल्ले परिसराचे हरितीकरण/वनीकरण करण्याची कार्यवाही वन विभागामार्फत केली जाईल. तसेच पर्यटनाच्या दृष्टिकोनातून रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तयार करण्यात येणार आहेत.