युवराजांच्या संमतीने खाशोगींची ‘हत्या’
- ‘वॉशिग्टंन पोस्ट’ या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या दैनिकातील स्तंभलेखक आणि पत्रकार जमाल खाशोगी यांच्या हत्याप्रकरणामध्ये पुन्हा एकदा सौदी अरेबियाचे युवराज मोहंमद बिन सलमान यांचे नाव चर्चेत आले आहे.
- खाशोगी यांच्या हत्येला सलमान यांनीच मान्यता दिली होती, असा दावा अमेरिकेच्या गोपनीय अहवालात करण्यात आला आहे.
- अमेरिकी गुप्तचर संस्था CIA आणि अन्य संस्थांकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. खाशोगी यांची ऑक्टोबर २०१८ मध्ये इस्तंबूल शहरात सौदीच्या दूतावासामध्ये अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती.
- खाशोगी यांच्या हत्येनं जगभर खळबळ उडाली होती. खाशोगी यांची हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले होते.
- खाशोगी ही कागदपत्रे मिळवण्यासाठी इस्तंबूल येथील दूतावासात गेले होते. तेथून ते जिवंत परत आलेच नाहीत. सुरुवातीस खाशोगी दूतावासातून कुठे गेले ते माहिती नाही, असा पवित्रा सौदी अरेबियाने घेतला होता.
- नंतर प्रथम तुर्कस्तान आणि नंतर संयुक्त राष्ट्रांच्या तपास अधिकाऱ्यांनी अधिक चौकशी केल्यानंतर खाशोगी यांची हत्या झाल्याची कबुली सौदी अरेबियाला द्यावी लागली.
- या घटनेविषयीचा संशय राजपुत्र सलमान यांच्याकडे वळल्यानंतर ते काही महिने अज्ञातवासात गेले होते.