
यापुढे आकाशवाणीचे संगीत संमेलन पंडित भीमसेन जोशी यांच्या नावाने ओळखले जाईल : प्रकाश जावडेकर
- स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांची जन्मशताब्दी ४ फेब्रुवारीपासून सुरू झाली. त्या निमित्ताने आर्य संगीत प्रसारक मंडळाने ‘अभिवादन’ हा सांगीतिक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी आकाशवाणीचे संगीत संमेलन यापुढे ‘भारतरत्न पंडित भीमसेन जोशी आकाशवाणी संगीत संमेलन’ या नावाने ओळखले जाईल, अशी घोषणा केंद्रिय माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली.
- कार्यक्रमप्रसंगी बोलताना जावडेकर म्हणाले, ‘अटलजींच्या काळात पंडित भीमसेन जोशींना भारतरत्न देण्यात आला. अशा कलाकारांमुळे देशाची मान उंचावते. भीमसेनजींचे संगीत हा भारताचा ठेवा असून त्यांचे गाणे हेच त्यांचे स्मारक आहे.’
- यावेळी जावडेकर यांच्यासह माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, महापौर मुरलीधर मोहोळ आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे उपस्थित होते. तसेच पंडित भीमसेनजींचे पुत्र व मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशीही यावेळी उपस्थित होते. अच्युत पालव यांनी साकारलेल्या बोधचिन्हाचे (मोनोग्राम) प्रकाशन या कार्यक्रमाच्या वेळी करण्यात आले.
- दूरदर्शन आणि आकाशवाणीने त्यांच्या संगीताचा खजिना यापूर्वीच लोकांसाठी खुला केला आहे. लोकांपर्यंत तो सहजपणे पोहोचावा यासाठी लवकरच त्याची फेररचना करण्यात येणार असल्याचे जावडेकर यांनी सांगितले. तसेच परदेशातून शास्रीय संगीत शिकण्यासाठी भारतामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्याला भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेतर्फे १.५० लाख रुपयांची ‘स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी पाठ्यवृत्ती’ देण्याची घोषणा अध्यक्ष सहस्रबुद्धे यांनी केली.
- राजकीय क्षेत्रात काम करताना मराठी आणि कानडी अशा वादात अडकवले जाते. पण हे अंतर न ठेवता पंडितजींनी संगीताच्या माध्यमातून मराठी आणि कानडीला एकसंध करण्याची कामगिरी करून दाखविली. याद्वारे समाजाची अखंड सेवा करण्यासाठी पंडितजींनी आयुष्य वेचले, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.
- पंडितजींनी सवाई गंधर्व संगीत महोत्सवाच्या माध्यमातून नवीन कलाकारांना नेहमीच प्रोत्साहित केले. ती परंपरा आजही कायम असल्याचा आनंद वाटतो, असेही पवार म्हणाले. पवार यांनी पुढे बोलताना जोपर्यंत संगीतप्रेमी आहेत तोपर्यंत पंडित भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर या दोन भारतरत्नांचे नाव कायमच घेतले जाईल. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा ओलावा कायमच जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले.
- आकाशवाणीद्वारे पंडितजींची ‘संतवाणी’ आणि बाबूजींचे ‘गीतरामायण’ घराघरात पोहोचले. उद्घाटन सोहळ्यानंतर पंडितजींचे ज्येष्ठ शिष्य पंडित उपेन्द्र भट यांच्या गायनाने पहिल्या सत्रातील सांगीतिक मैफिलीची सुरुवात झाली.
पंडित भीमसेन जोशी यांच्या विषयी थोडक्यात :
- जन्म – ४ फेब्रुवारी १९२२ (गडग, रोन, कर्नाटक)
- मृत्यू – २४ जानेवारी २०११ (पुणे)
- टोपण नाव – अण्णा
- गायनप्रकार – हिंदुस्तानी शास्रीय संगीत.
- घराणे – किराणा घराणे
- पुरस्कार –
भारतरत्न (२००८)
पद्मविभूषण (१९९९)
संगीत नाटक अकादमी फेलोशिप (१९९८)
पद्मभूषण (१९८५)
पद्मश्री (१९७२).