माळढोक संवर्धनासाठी वीजवाहिन्या भूमिगत
- माळढोक प्राण्यांचे अस्तित्व असणाऱ्या राज्यात ऊर्जा प्रकल्पांचे नूतनीकरण करताना सर्व वीजवाहिन्या भूमिगत असाव्यात असे निर्देश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत.
- केंद्रीय वने, पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयाने तसेच संबंधित राज्यांनी विद्यमान सौर आणि पवन ऊर्जा वाहिन्यांवर पक्ष्यांना परतवून लावणारे उपकरण चार महिन्यांच्या आत बसवण्याचेही आदेश लवादाने दिले आहेत.
- प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, राजस्थान या राज्यात नवीन वीज योजनेकरिता सर्व वीजवाहिन्या भूमिगत करण्याचे निर्देश लवादाने केंद्रीय वने, पर्यावरण व हवामानबदल मंत्रालयाला दिले आहेत.
माळढोक पक्ष्याविषयी :
- माळढोक (शास्त्रीय नाव – Ardeotis Nigriceps) हा भारतात आणि भारताला लागून असलेल्या पाकिस्तानमधील कोरड्या प्रांतात आढळणारा अत्यंत दुर्मिळ पक्षी आहे. या पक्ष्याच्या संरक्षणासाठी अनेक राज्य सरकारांनी ठोस पावले उचलली आहेत. या पक्ष्याला इंग्रजीत ग्रेट इंडियन बस्टर्ड असे म्हणतात. विदर्भात याच पक्ष्याला हूम असे म्हणतात. हा पक्षी शहामृगासारखा दिसतो, उडणाऱ्या पक्ष्यांमधील सर्वात जड पक्ष्यांपैकी हा एक आहे. भारतातील कोरड्या माळरानांवर एकेकाळी सहज दिसणाऱ्या या पक्ष्यांची संख्या 2018 मध्ये 150 इतकी असल्याचा अंदाज आहे.शिकार आणि अधिवासाचा ऱ्हास यामुळे ही प्रजाती अतिशय संकटग्रस्त स्थितीत आहे. हा पक्षी सन 1972 च्या वन्यजीव अधिनियमान्वये संकटग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आला असून त्याचा समावेश IUCN च्या यादीत शेड्यूल एक मध्ये करण्यात आला आहे. याचे मुख्य खाद्य छोटे व मोठे किडे, टोळ, बिया, छोटी झुडपे इत्यादी आहे.
- माळढोक पक्ष्याचा आढळ : माळढोक पक्षी भारतामध्ये फक्त आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यात आढळतो. महाराष्ट्रात हा पक्षी साधारणतः दुष्काळी जिल्ह्यांमध्ये म्हणजेच अहमदनगर, बीड, सोलापूर तसेच नागपूर जिल्ह्यांत आढळतो.
सोलापूरजवळ नान्नज अभयारण्य येथे या पक्ष्यासाठी संरक्षित अरण्य स्थापन झाले आहे. हे महाराष्ट्रातील आकाराने सर्वात मोठे अभयारण्य आहे. या अभयारण्याची घोषणा 1979 मध्ये करण्यात आली. या अभयारण्याचे एकूण क्षेत्रफळ 8496.44 चौरस किलोमीटर आहे. या अभयारण्यात सोलापूर जिल्ह्याचे उत्तर सोलापूर, माढा, मोहोळ आणि करमाळा तालुक्याचे काही क्षेत्र व अहमदनगर जिल्ह्याच्या कर्जत, श्रीगोंदा व नेवासा तालुक्यातील काही क्षेत्राचा समावेश होतो. या अभयारण्याचे मुख्यालय सोलापूर जिल्ह्यासाठी नान्नज येथे व अहमदनगर जिल्ह्यासाठी रेहेकुरी येथे आहे.
माळढोक पक्ष्यासाठी प्रसिद्ध असलेली देशातील अभयारण्ये
अभयारण्य राज्य
डेझर्ट नॅशनल पार्क राजस्थान
घाटीगाव ॲण्ड कार्ला सॅक्च्युरीज मध्यप्रदेश
कच्छ बस्टार्ड सॅक्च्युरी गुजरात
ग्रेट इंडियन बस्टार्ड महाराष्ट्र
रोल्लापाडू वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आंध्रप्रदेश
- गेल्या तीन दशकांत माळढोकची संख्या 75 टक्क्यांनी कमी झाली आहे. आकाराने मोठ्या असणाऱ्या माळढोक पक्ष्यांना शरीराचे वजन आणि इतर कारणामुळे हवेमध्ये तातडीने दिशा बदलता येत नाही. परिणामी उडताना समोर विद्युतवाहक तारा आल्यास त्याला धडकून विजेच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू होतो. 15 टक्के माळढोक पक्ष्यांचा मृत्यू हा विजेचा धक्का लागून झाला आहे.
राष्ट्रीय हरित लवादाविषयी
- राष्ट्रीय हरित लवादाची स्थापना 18 ऑक्टोबर 2010 रोजी राष्ट्रीय लवाद अधिनियम 2010 अंतर्गत झाली आहे.
- पर्यावरणविषयक अशी संस्था स्थापन करणारा भारत जगातील तिसरा देश आहे.
- राष्ट्रीय हरित लवादाचे मुख्यालय दिल्ली येथे असून त्यांची प्रादेशिक कार्यालये भोपाळ, पुणे, कोलकाता आणि चेन्नई येथे आहेत.
- राष्ट्रीय हरित लवाद अधिनियमानुसार पर्यावरणविषयक मुद्यांचा निकाल 6 महिन्यांच्या आत लावला जातो.
- लवादात अध्यक्ष, न्यायिक आणि विशेषज्ञ (किमान दहा तर कमाल 20) सदस्य असतात. त्यांचा कार्यकाल पाच वर्षांचा असतो.