भीमामाईचा उलगडणार प्रवास
- पंचवीस धरणे, मुळा-मुठेसह १४ प्रमुख नद्या आणि त्यांच्या उपनद्या, ४६ हजार १८४ चौरस किलोमीटरचे भौगोलिक क्षेत्र असलेल्या अन् उगमापासून ते कर्नाटकच्या हद्दीपर्यंतच्या भीमा नदीच्या प्रवासाचा अभ्यास प्रथमच होणार आहे.
- त्यासाठी देशपातळीवरील तज्ज्ञांचा सहभाग असलेली विशेष समिती राज्य सरकारकडून स्थापन करण्यात आली आहे.
- या समितीच्या माध्यमातून पुणे शहरात दरवर्षी येणाऱ्या पुराचा अभ्यासदेखील होणार आहे.
- २०१९ साली कृष्णा नदीला आलेल्या पुराने सांगली, कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना मोठा फटका बसला होता.
- या दोन्ही जिल्ह्यांतील प्रमुख शहरे दहा दिवस पाण्याखाली होती.
- या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने समिती नेमली होती.
- या समितीने अभ्यास करून या संदर्भातील उपाययोजनांचा अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे.
- त्याच धर्तीवर प्रथमच भीमा खोऱ्याचा अभ्यास करण्यासाठी ही समिती स्थापन केली आहे.
- जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव राजेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमध्ये बारा सदस्यांचा समावेश आहे.
- जलसंपदा बरोबरच भारतीय हवामान विभागातील तज्ज्ञ, आयआयटी मुंबई, केंद्रीय जल व विद्युत संशोधन संस्था, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर यांच्यासह या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश या समितीमध्ये आहे.
पावसाचे प्रमाण जास्त
- भीमा नदीचा उगम सह्याद्री पर्वतरांगांमध्ये होतो.
- पुणे शहरापासून प्रामुख्याने वरील बाजूस ५० किलोमीटर्स अंतरावर असलेल्या या डोंगरभागात सरासरी ६०० मिलीमीटर पाऊस पडतो.
- तर पुणे शहरापासून सोलापूरच्या दिशेने पावसाचे प्रमाण टप्प्याटप्याने कमी होत जाते.
- साधारणत: ६०० मिमी उगमापासून १०० किमीच्या परिसरात ३५० मिमी पाऊस पडतो.
- तर पुढील टप्प्यात पावसाचे प्रमाण कमी होऊन ते २५ मिमी इतके होते.
समितीचे कार्यक्षेत्र
- भीमा नदी पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे उगम पावते.
- राज्यातील पुणे, नगर, सोलापूर या जिल्ह्यातून वाहत कर्नाटकात तर पुढे आंध्र प्रदेशाच्या हद्दीवर ती कृष्णा नदीला मिळते.
- पुणे जिल्ह्यात लहान मोठी अशी एकूण सुमारे २५ धरणे असून या सर्व धरणातील पाणी उजनी धरणात एकत्र येते.
- त्यामुळे मुख्य असलेल्या भीमा नदीबरोबरच तिच्या उपनद्यांचासुद्धा अभ्यास करण्यात येणार आहे.
भीमा नदी
- उगम : भीमाशंकर (पुणे)
- लांबी : ४५१ किमी (महाराष्ट्रात), एकूण लांबी = ८६० किमी
- क्षेत्रफळ : ४६,१८४ चौ. किमी
- कर्नाटकात रायचूरजवळ कुरुगुड्डी येथे कृष्णा व भीमा या नद्यांचा संगम होतो.
- भीमा ही कृष्णेची उपनदी असली तरी भीमेचा महाराष्ट्रात स्वतंत्र प्रवाह आहे.
- भीमा खोऱ्यात पुणे व सोलापूर जिल्ह्यांचा पूर्णपणे समावेश होतो.
- भीमा नदी पुणे-सोलापूर व पुणे- अहमदनगर या जिल्ह्यांची सीमा निश्चित करते.
- उपनद्या : उजव्या तीराने – भामा, इंद्रायणी, मुळा-मुठा, नीरा, माण, बोर, पवना
- डाव्या तीराने – घोड, सीना, वेळ