भारत-चीनमधील ताणलेले संबंध सुधारण्यासाठी भारताने केले अष्टसूत्री पर्यायांचे सूतोवाच
- लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक घडामोडीनंतर भारत-चीन द्विपक्षीय संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला. कंट्रोल लाइनमध्ये एकतर्फी बदल कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाही. दोन्ही देश निर्णायक वळणावर असून या परिस्थितीत घेतला जाणारा कोणताही निर्णय संपूर्ण जगावर परिणाम करणारा असेल, अशा कडक शब्दांत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनला सुनावले. ते चायना स्टडीजच्या १३व्या अखिल भारतीय परिषदेत बोलत होते.
- गेल्या ५ मे पासून दोन्ही देशांचे-सैन्य पूर्व लडाखमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. तिथे घडलेल्या हिंसक घडामोडींमुळे भारत व चीन यांच्यामधील संबंध कमालीचे तणावपूर्ण झाले आहेत. कारण सीमेवर सैन्याची जमावजमव व बदललेली भूमिका या मागील कारणे याचे चीनने अद्याप भारताला विश्वासार्ह स्पष्टीकरण दिलेले नाही, असे जयशंकर यांनी सांगितले.
- तणावपूर्ण निर्माण झालेली ही परिस्थिती सुधारण्यासाठी जयशंकर यांनी अष्टसूत्री मांडली. यामध्ये सीमा व्यवस्थापनाबाबत जे सर्व करार झाले आहेत त्यांचे कटाक्षाने पालन करणे, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा सन्मान राखणे, सीमेवर शांतता राखणे, या सर्व प्रकारच्या संबंधांचा आधार असावा, अशा तत्त्वांचा या अष्टसूत्रीमध्ये समावेश आहे.
- आशियातील पुढे येणाऱ्या शक्ती या नात्याने दोन्ही देशांनी परस्परांच्या इच्छा-आकांक्षांचा आदर करावा. एकमेकांचा आदर, संवेदना आणि हित ह्याच तीन गोष्टी संबंध सुधारण्यास मदत करतील, असे जयशंकर म्हणाले. या गोष्टींकडे दुर्लक्ष करता येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.