ब्रह्मपुत्रा नदीवर मोठे धरण व जलविद्युत प्रकल्प उभारण्यास चीनच्या संसदेची मंजुरी
- अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर तिबेटमध्ये चीनने ब्रह्मपुत्रा नदीवर एक मोठे धरण व जलविद्युत प्रकल्प उभारण्याची योजना आखली आहे. ईशान्य भारतातील ब्रह्मपुत्रा नदीला चीनमध्ये यारलुंग झँगबो नावाने ओळखले जाते.
- या प्रकल्पांसाठी चीनच्या संसदेने चौदाव्या पंचवार्षिक योजनेमध्ये मान्यता दिली आहे. ब्रह्मपुत्रा नदीच्या खालच्या प्रवाहांवर अनेक धरणे उभारण्याचा चीनचा निर्धार आहे. यामुळे भारत आणि बांग्लादेशाला होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर याचा विपरित परिणाम होऊ शकतो.
- चीनच्या या योजनेमध्ये अरुणाचल प्रदेशच्या सीमेला लागून ब्रह्मपुत्रा नदीवर जलविद्युत प्रकल्प होणार आहे. या प्रकल्पामुळे भारताच्या चिंता वाढल्या आहेत.
- चीनच्या याआधीही तिबेट भागातील नद्यांच्या उगमस्थानी धरणांचे काम केले आहे. मात्र या प्रकल्पांची माहिती देण्याचे टाळले आहे. यामुळे भारताच्या सुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकतो. चीनच्या विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या अनेक घटना या आधी घडल्या आहेत. बांग्लादेशनेही या प्रकल्पांना विरोध केला आहे. दरम्यान या प्रकल्पाबाबत भारताने याआधी देखील चीन सरकारकडे चिंता व्यक्त केली होती.
- चीनने २०३५ पर्यंत देशामध्ये मोठी आर्थिक आणि सामाजिक प्रगती साध्य करण्याचे ध्येय निश्चित केले असून यासाठी २०२१-२०२५ हे पंचवार्षिक धोरण स्वीकारले आहे. चीनच्या पीपल्स काँग्रेसचे अधिवेशन भरले होते. यामध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आले.
- या अधिवेशनाला चीनचे राष्ट्राध्यक्ष शि जिनपिंग, पंतप्रधान ली केक्वियांग आणि अन्य नेते उपस्थित होते. चीनच्या विकासाच्या ब्लू प्रिंटला या अधिवेशनात मान्यता देण्यात आली. यामध्ये ६० मोठ्या प्रकल्पांचा समावेश आहे.
- चीनने २०१५ मध्येच तिबेटमध्ये १.५ अब्ज डॉलर्सचे झांग्मू हायड्रो पॉवर स्टेशन सुरू केले आहे.
- तिबेटच्या स्वायत्त भागातून उगम पावणारी ब्रह्मपुत्रा नदी अरुणाचल प्रदेशमधून भारतात प्रवेश करते. अरुणाचलमध्ये या नदीला सियांग म्हटले जाते. त्यानंतर ही नदी आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नावाने ओळखली जाते. आसाममधून ही नदी पुढे बांग्लादेशमधून वाहत जात बंगालच्या उपसागराला मिळते.
- दरम्यान तिबेट स्वायत्त प्रदेशाचे चिनी कम्युनिस्ट पक्षाचे उपप्रमुख चे दालहा यांनी चीन सरकारने यंदाच धरण बांधण्यास सुरुवात करण्याचे सांगितले. यामध्ये तिबेटमधील नैसर्गिक वायूच्या शोधावरदेखील गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे.