बुद्धदेव दासगुप्ता
- राष्ट्रीय पुरस्कार विजेते बंगाली दिग्दर्शक बुद्धदेव दासगुप्ता यांचे कोलकात्यामध्ये निधन झाले. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
- बुद्धदेव दासगुप्ता यांनी आपल्या करियरची सुरुवात अध्यापक म्हणून केली होती. पुढे अध्यापन करण्याचाच कंटाळा आल्यामुळे मास्तरकी सोडून ते चित्रपट क्षेत्राकडे वळले. बंगालच्या भूमीत एखादी व्यक्ती चित्रपटाकडे कशी वळली. याविषयीच्या अनेक अद्भूत कहाण्यांपैकी ही एक कहाणी.
- विविध क्षेत्रातील कामाने त्यांची समाजाशी नाळ जोडली गेली. ते एक महान विचारवंत आणि कवीही होते.
- हायस्कूलच्या वयापासूनच कलकत्ता फिल्म सोसायटीमध्ये जाण्याची संधी मिळणे हे त्यांच्या दृष्टीने मार्गदर्शक आणि भाग्यजनक ठरले. अकिरा कुरोसावा, व्हिटोरिया डे सिका, इंग्मार बर्गमन, रोबेर्तो रोसेलिनी, चार्ली चॅपलीन यांचे सिनेमे पाहून या माध्यमाविषयी त्यांचा रस वाढत गेला.
- कवितेविषयीसुद्धा त्यांना चित्रपटाएवढीच आसक्ती होती. फिल्ममेकिंगमध्ये आल्यानंतरही समीक्षकांना त्यांच्या चित्रकृतीमध्ये भावकाव्यात्मता दिसत होती. आशय आणि विषयापेक्षाही पडद्यावरील चलचित्रांद्वारे संवाद साधणे ही त्यांची खुबी होती. ही खुबी बहुधा पारंपरिक मातब्बर बंगाली दिग्दर्शकांच्या गटात न बसवणारी आहे.
- परंतु त्यांच्या ‘वाघ बहादूर’ किंवा ‘मोंदो मेयेर उपाख्यान’ सारख्या चित्रपटांमध्ये आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचे वास्तवच दाखवले जाते. असे मराठी किंवा तमिळ प्रेक्षकालाही वाटू शकेल, असे बुद्धदेव दासगुप्ता यांचे बलस्थान होते.
- ‘लाल दर्जा’, ‘चराचर’, ‘कालापुरुष’, ‘बाघ बहादूर’ आणि ‘मोंदो मेयेर उपाख्यान’ या त्यांच्या पाच चित्रपटांना सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. ‘उत्तरा’ आणि ‘स्वप्नेर दिन’ साठी ते सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरले. बंगाली बरोबरच हिंदीमध्येही त्यांनी सहज आणि प्रभावीपणे चित्रपटांची निर्मिती केली.
- चित्रपटाला सुरुवात, मध्य व शेवट असेल, पण त्याचक्रमाने त्याचे आख्यान सादर होईलच असे नाही. पाश्चिमात्य नवचित्रपट चळवळीतही काही दिग्दर्शकांनी हा विचार मांडला. ‘तुला काय दिसावे’ यापेक्षा ‘मला काय सांगायचे’ हे महत्त्वाचे ठरू लागले.
- या प्रवाहाच्या विरोधात पोहण्याच्या त्या धाडसात कित्येकजण मागे पडले पण बाकीच्यांनी चित्रपट माध्यमाला समृद्ध केले. यामध्ये बुद्धदेव दासगुप्तासारख्या दिग्दर्शकाचा समावेश होतो. त्यांनी १९६८ साली १० मिनिटांच्या डॉक्युमेंटरीने चित्रपट सृष्टीत पाऊल टाकले होते. त्यांचा पहिला चित्रपट ‘दुरात्वा’ १९७८ साली प्रदर्शित झाला होता.
- बुद्धदेव दासगुप्ता यांच्या अनेक कविता प्रकाशित झाल्या आहेत. ज्यात कोफिन किंम्बा सुटकेस, हिमजोग, श्रेष्ठ कविता, भोमबोलर आश्चर्य कहानी यांचा समावेश आहे. चित्रपट कर्मी, विचारवंत आणि कवी श्री. बुद्धदेव दासगुप्ता यांच्या निधनाबद्दल बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. व त्यांच्या कुटुंब आणि चाहत्यांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहे.