बांग्लादेशातील रमणा काली मंदिराचे राष्ट्रपतींद्वारा उद्घाटन
- नुकतेच भारताच्या राष्ट्रपतींनी बांग्लादेशाची राजधानी ढाका येथे मध्यवर्ती भागात स्थित पुनर्निर्मित रमणा काली मंदिराचे उद्घाटन केले आहे.
- बांग्लादेश मुक्तिसंग्रामाच्या ५० वर्षांच्या समारंभानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद बांग्लादेश दौऱ्यावर आहेत.
रमणा काली मंदिर
- ४०० वर्षांपूर्वी मुघल काळात हे मंदिर बांधले आहे असे मानले जाते.
- बांग्लादेशातील ढाकेश्वरीनंतर रमणा काली मंदिर हे दुसरे सर्वात जुने हिंदू मंदिर आहे.
- २०व्या शतकाच्या सुरुवातीला प्रसिद्ध संत माँ आनंदमयी यांनी या मंदिराच्या आवारात त्यांचा आश्रम बांधला.
- २५ मार्च १९७१ रोजी पाकिस्तानी लष्कराने ऑपरेशन सर्चलाइटद्वारे हे मंदिर उद्ध्वस्त केले होते.
- २०१७ मध्ये भारत सरकारने मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी पैसे देण्याचे वचन दिले होते.
- भारत आणि बांग्लादेशातील लोकांमधील आध्यात्मिक आणि सांस्कृतिक बंधनाचे प्रतीक म्हणून हे मंदिर महत्त्वपूर्ण आहे.
१९७१ चा बांग्लादेश मुक्तिसंग्राम
- १९७१ पूर्वी बांग्लादेश हा पाकिस्तानचा एक प्रांत होता. ज्यास ‘पूर्व पाकिस्तान’ असे संबोधले जाते.
- अनेक वर्षांचा संघर्ष, पाकिस्तानी सैन्याचे अत्याचार आणि बंगाली भाषिकांच्या दडपशाहीविरुद्ध पूर्व पाकिस्तानातील लोक रस्त्यावर उतरले.
- पाकिस्तान लष्कराद्वारा ऑपरेशन सर्चलाइटच्या माध्यमातून प्रचंड नरसंहारास सुरुवात झाली.
- पूर्व पाकिस्तानातील स्थिती सुधारण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय समुदायास आवाहन केले, परंतु कोणत्याही देशाने लक्ष दिले नाही व विस्थापित लोक भारतात येत राहिले.
- यावेळी एप्रिल १९७१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बांग्लादेश मुक्तिसंग्रामास पाठिंबा देऊन डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानी लष्करावर विजय मिळविला.
- १६ डिसेंबर १९७१ ह्या ऐतिहासिक दिवशी स्वतंत्र बांग्लादेशची निर्मिती झाली व हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.
भारत-बांग्लादेश संबंध
अ) व्यापार संबंध : बांग्लादेश दक्षिण आशियातील भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षात बांग्लादेशची निर्यात ९.२१ अब्ज अमेरिकन डॉलर्स तर आयात १.०४ अब्ज अमेरिकन डॉलर्स आहे.
ब) कनेक्टिव्हिटी : कोलकाता आणि आगरताळा दरम्यानची थेट बस सेवा ५०० किमी अंतरावर चालते. बांग्लादेश आपल्या मोंगला आणि चट्टोग्राम (चितगाव) बंदरांवरून रस्ते, रेल्वे आणि जलमार्गाने आगरताळ्यापर्यंत माल पाठविण्यास परवानगी देतो.
क) भारतातील आंतरराष्ट्रीय वैद्यकीय रुग्णांपैकी ३५ टक्क्यांपेक्षा अधिक वाटा बांग्लादेशचा आहे.
ड) मार्च २०२१ मध्ये पश्चिम बंगालमधील न्यू जलपायगुडी आणि ढाका यांना जोडणाऱ्या मिताली एक्स्प्रेस (भारत-बांग्लादेश दरम्यान धावणारी तिसरी रेल्वे) चा प्रारंभ झाला आहे.
इ) बांग्लादेश सशस्त्र दलाच्या १२२ सदस्यीय तुकडीने ५०व्या बांग्लादेश मुक्तिसंग्रामाच्या स्मरणार्थ भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेतला होता.