पुण्यातील येरवड्यात देशातील पहिले कारागृह पर्यटन

पुण्यातील येरवड्यात देशातील पहिले कारागृह पर्यटन 

  • ‘कारागृह पर्यटन’ या अभिनव संकल्पनेचा प्रारंभ पुण्यातील येरवडा कारागृहातून (२६ जानेवारी रोजी) करण्यात आला.
  • या अभिनव संकल्पनेचे उद्‌घाटन २६ जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले.
  • कारागृहाचा इतिहास जनतेला समजावा हा या ‘कारागृह पर्यटन’चा उद्देश आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून विद्यार्थी आणि सर्वसामान्य जनतेला पर्यटन करता येणार आहे.

येरवडा मध्यवर्ती कारागृहाविषयी :

  • येरवडा मध्यवर्ती तुरुंग हा महाराष्ट्रातील पुणे शहरात असलेला अतिसुरक्षित मोठा तुरुंग आहे. हा तुरुंग महाराष्ट्रातील सर्वात मोठा तुरुंग आहे. तर दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या तुरुंगापैकी एक आहे. यात अंदाजे ३६०० कैदी बंदिस्त राहू शकतात.
  • हे कारागृह ५१२ एकर जागेत पसरलेले आहे. या तुरुंगात अत्यधिक सुरक्षा असलेल्या कैद्यांसाठी अंडा जेलसुद्धा आहे.
  • येरवडा मध्यवर्ती कारागृह ब्रिटिशांनी १८७१ मध्ये बांधले. ब्रिटिश राजवटीमध्ये या कारागृहात अनेक स्वातंत्र्य सैनिकांना कारावासात ठेवले होते. यामध्ये महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, जोकिम अल्वा, लोकमान्य टिळक आणि भुरालाल रणछोडदास शेठ यांचा समावेश आहे. १९२४ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनासुद्धा येथे ठेवण्यात आले होते. महात्मा गांधींनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या दरम्यान येरवडा मध्यवर्ती कारागृहात अनेक वर्षे बंदिवास भोगला. १९३२ आणि नंतर १९४२ मध्ये चलेजाव चळवळीच्या वेळी ते इथे होते. १९३२ मध्ये गांधीजींना अटक झाल्यावर त्यांना येथे ठेवण्यात आले. तेव्हा ब्रिटिश सरकारने जातीय निवाडा घोषित केल्यामुळे गांधीजींनी आमरण उपोषणास सुरुवात केली. २४ सप्टेंबर १९३२ रोजी गांधीजी आणि डॉ. आंबेडकर यांच्यातील पुणे करारावर स्वाक्षऱ्या झाल्यावर गांधीजींनी उपोषण मागे घेतले. मे १९३३ मध्ये गांधीजींची तुरुंगवासातून सुटका करण्यात आली. १९७५-७७ मध्ये आणिबाणीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर संघचालक बाळासाहेब देवरस, अटलबिहारी वाजपेयी, प्रमिला दंडवते आणि वसंत नारगोळकर यांना तुरुंगवासात ठेवण्यात आले होते. बॉलिवूड अभिनेता संजय दत्त २००७ मध्ये या तुरुंगात होता. स्टँप पेपर घोटाळ्यातील गुन्हेगार तेलगी हा या तुरुंगात होता. २६ नोव्हेंबरच्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात अटक केलेला दहशतवादी कसाब २००८ मध्ये या तुरुंगात होता.

Contact Us

    Enquire Now