पश्चिम घाटावरील कस्तुरीरंगन समितीच्या अहवालास कर्नाटकचा विरोध
- पश्चिम घाटावरील कस्तुरीरंगन समितीच्या अहवालाला राज्याचा विरोध असल्याची माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केंद्राला दिली.
- कारण : पश्चिम घाटाला पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केल्यास या भागातील लोकांच्या जीवनावर विपरीत परिणाम होईल, असे त्यांना वाटते.
पार्श्वभूमी
अ) गाडगीळ समिती
- या समितीने पर्यावरणीय व्यवस्थापनाच्या उद्देशाने पश्चिम घाटाच्या सीमा परिभाषित केल्या.
- हे क्षेत्र पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून नियुक्त करण्याचा प्रस्ताव.
- या क्षेत्रांचे त्यांची विद्यमान स्थिती आणि धोक्याच्या स्वरुपावर आधारित पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र (ESZ) I, II, III म्हणून वर्गीकरण करण्यात येईल.
- हे क्षेत्र सुमारे २,२०० ग्रीडमध्ये विभाजीत करण्याचा प्रस्ताव आहे, त्यापैकी ७५ टक्के ESZ I किंवा II अथवा वन्यजीव अभयारण्ये, नैसर्गिक उद्यानांसारख्या आधीच अस्तित्वात असलेल्या संरक्षित क्षेत्रांतर्गत येतील.
- तसेच या समितीने या क्षेत्रांतील क्रियाकलापांचे नियमन करण्यासाठी पश्चिम घाट पर्यावरण प्राधिकरण स्थापनेची तरतूद केली आहे.
ब) कस्तुरीरंगन समिती
- २०११ मध्ये अहवाल सादर करणाऱ्या गाडगीळ समितीच्या शिफारशींना संबंधित सहा राज्यांपैकी एकानेही सहमती दर्शविली नाही.
- त्यामुळे ऑगस्ट २०१२ मध्ये गाडगीळ समितीच्या अहवालाचे परिक्षण करण्यासाठी कस्तुरीरंगन यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम घाटावर एक उच्च स्तरीय कार्यगटाची स्थापना करण्यात आली.
- या समितीने एप्रिल २०१३ मध्ये पर्यावरण मंत्रालयाला अहवाल सादर केला व त्यास १८ ऑक्टोबर २०१३ रोजी मंजूरी देण्यात आली.
- गाडगीळ अहवालाने सुचविलेल्या पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्राचे ६४ टक्क्यांवरून ३७ टक्क्यांपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला आहे.
कस्तुरीरंगन समितीच्या शिफारसी
१) ESA मध्ये खाण, उत्खनन आणि वाळू उपस्यासाठी बंदी
२) कोणतेही नवीन औष्णिक ऊर्जा प्रकल्प उभारण्यास बंदी मात्र ठराविक निर्बंधासह जलविद्युत प्रकल्पांना परवानगी
३) प्रदूषण वाढविणाऱ्या नव्या उद्योगांवर बंदी
४) २०००० चौरस मीटरपर्यंतच्या बांधकाम प्रकल्पांना परवानगी द्यायची परंतु टाऊनशिप्सवर बंदी
५) अतिरिक्त सुरक्षा उपाययोजनांसह वने वळविण्यास परवानगी दिली जाऊ शकते.
६) या प्रदेशात होणाऱ्या भविष्यकालीन प्रकल्पांसंबधी खेड्यातील रहिवाश्यांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग असावा, तसेच ग्रामसभेची सहमती आणि ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक
पश्चिम घाटाचे महत्त्व
- हा घाट गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू या सहा राज्यांत पसरला आहे.
- याची सरासरी लांबी १६०० किमी असून सरासरी उंची २६९५ मी. आहे.
- पश्चिम घाटाची उंची उत्तरेकडून दक्षिणेकडे वाढत जाते, याउलट महाराष्ट्रात सह्याद्री पर्वत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम घाटाची उंची उत्तरेकडून दक्षिणेकडे कमी होत जाते.
- पश्चिम घाटाचा सर्वाधिक ६० टक्के भाग कर्नाटक राज्यात येतो.
- पश्चिम घाट हा जगभरातील जैवविविधतेच्या प्रमुख आठ हॉटस्पॉट्सपैकी एक आहे.
- या घाट परिसरात मोठ्या प्रमाणात वन्यजीवसंपदा असून येथे १४० प्रकारचे सस्तन प्राणी, १८० प्रकारचे उभयचर प्राणी, व ५१० पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात.
- भारतातील एकूण जैवविविधतेपैकी २५ टक्के जैवविविधता पश्चिम घाटात आढळते.