नवउद्योगांना बौद्धिक संपदेसाठी १० लाखापर्यंत अर्थसाहाय्य
- राज्यातील होतकरू तरुणांच्या नवनवीन संकल्पनांवर आधारित नवोद्योगांना बौद्धिक संपदा मिळवण्यासाठी राज्य शासनांमार्फत १० लाख रुपयांपर्यंत अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे.
- तसेच नवउद्योगांना गुणवत्ता परीक्षण आणि प्रमाणपत्राकरिताही २ लाख रुपयांपर्यंतचे अर्थसाहाय्य मिळणार आहे. या दोन योजनांचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला.
- महाराष्ट्रात प्रचंड बुद्धिमत्ता असलेले युवक असून या हिऱ्यांना पैलू पाडण्याचे काम कौशल्य विकास विभागाने हाती घ्यावे. ज्यांना नवीन काही करण्याची इच्छा आहे अशा तरुणांना साधन, संपत्ती आणि मार्गदर्शन पुरवावे, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी केले.
- निती आयोगामार्फत जाहीर झालेल्या इंडिया इनोव्हेशन इंडेक्समध्ये राज्याला दुसरा क्रमांक मिळाला आहे. यासह कौशल्य विकासाच्या विविध योजना, नवउद्योग आदी सर्वांमध्ये प्रथम क्रमांक मिळवण्याचे ध्येय महाराष्ट्र सरकारने जाहीर केले.
- राज्यात छोटे छोटे उद्योग सुरू केले जावेत व यासाठी ग्रामीण भागांत विविध उद्योगांसाठी आवश्यक कौशल्य दिले गेले पाहिजे. उत्पादनाचा दर्जा चांगला राखताना उत्पादित मालाच्या विक्रीसाठी संशोधनावरही भर देण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.