देशातील पहिल्या शंभर विद्यापीठांना आंतरराष्ट्रीय सहयोगाची मुभा
- नव्या शैक्षणिक धोरणात उच्च शिक्षणासाठी आंतरराष्ट्रीय संस्थांसह सहयोगावर भर देण्यात आलेला असताना विद्यापीठ अनुदान आयोगाने त्याबाबतची नियमावली तयार केली आहे.
- त्याअंतर्गत देशातील एनआयआरएफ क्रमवारीतील पहिल्या शंभर विद्यापीठांना जागतिक क्रमवारीतील पहिल्या पाचशे विद्यापीठांशी सहयोग करता येणार असून, दुहेरी संयुक्त आणि ट्विनिंग शैक्षणिक अभ्यासक्रम राबवता येणार आहे.
- नॅशनल इन्स्टिट्यूशन रँकिंग फ्रेमवर्कच्या क्रमवारीतील पहिल्या शंभर भारतीय उच्च शिक्षण संस्थांना किंवा केंद्र सरकारकडून श्रेष्ठत्वाचा दर्जा मिळालेल्या संस्थांना टाइम्स हायर एज्युकेशन किंवा क्यूएस जागतिक विद्यापीठ क्रमवारीतील पहिल्या पाचशे विद्यापीठांशी सहयोग करार करता येईल.
- ट्विनिंग प्रोग्रॅममध्ये भारतातील उच्च शिक्षण संस्थेत प्रवेशित विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमातील काही भाग परदेशातील संस्थेत जाऊन शिकता येईल. त्यांना पदविका किंवा पदवी भारतातील शिक्षण संस्थेकडून मिळेल. संयुक्त पदवीमध्ये भारतातील आणि परदेशी शिक्षण संस्थेने संयुक्तरीत्या अभ्यासक्रमाची निर्मिती केलेली असावी तर भारतातील उच्च शिक्षण संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या पदवी प्रमाणपत्रावर परदेशी शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह असेल. त्यासाठी विद्यार्थ्यांना दोन्ही शिक्षण संस्थांकडून प्रत्येकी ३० श्रेयांक मिळवावे लागतील. पीएचडीसाठी दोन्ही संख्यांचे मार्गदर्शक असणे आवश्यक आहे.
- दुहेरी पदवीमध्ये भारतातील आणि परदेशातील शिक्षण संस्थेकडून स्वतंत्रपणे पदवी प्रदान केली जाईल.