देशातील पहिले कृषी व शेतमाल निर्यात निर्मिती व मार्गदर्शन केंद्र पुण्यात स्थापन
- राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक नाबार्ड आणि चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरातील पहिले कृषी व शेतमाल निर्यात माहिती व मार्गदर्शन केंद्र पुण्यात स्थापन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन नाबार्डचे अध्यक्ष डॉ. जी. आर. चिंताला यांच्या हस्ते व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आले.
- कृषी उत्पादनाच्या निर्यातीत भारत जगात 13व्या स्थानावर आहे. सध्या महाराष्ट्र 30 दशलक्ष डॉलर्सचा कृषी उत्पादनांची निर्यात करतो. कृषी व शेतमाल निर्यात माहिती व मार्गदर्शन केंद्राच्या पुढाकाराने पुढील काही वर्षांत ही निर्यात 100 दशलक्ष डॉलर्सपर्यंत नेण्याचे आपले लक्ष्य असायला हवे, असा निश्चय चिंताला यांनी व्यक्त केला.
- हे केंद्र कृषी खाद्य निर्यातीसाठी क्षमता वाढवण्यास मदत करेल. मी या केंद्रास निर्यातदारांच्या मार्गदर्शनासाठी एक ‘स्टॉप शॉप’ म्हणतो; जे शेतकऱ्यांना आवश्यक असलेली सर्व माहिती देईल व सहाय्य करेल, असेही चिंताला म्हणाले.
- एमसीसीआयए च्या कृषी व कृषी व्यवसाय समितीचे अध्यक्ष उमेशचंद्र सरंगी, एमसीसीआयएचे अध्यक्ष सुधीर मेहता व महासंचालक प्रशांत गिरबाने आणि भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यावेळी उपस्थित होते.
- या निर्यातीच्या क्षेत्रामध्ये जे नवोदित निर्यातदार येऊ इच्छितात त्यांच्यासाठी हे केंद्र विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहे. यामध्ये विविध गोष्टींचा समावेश असेल. जसे की, कीडनाशकांचे उर्वरित औषधांचे व्यवस्थापन, ग्लोबल गॅप प्रमाणीकरण, विविध देशांकडून आयात केल्या जाणाऱ्या शेतमालासाठी गुणवत्तेचे कोणते निकष लावले जात आहेत, या विषयाची तपशीलवार माहिती दिली जाईल.
- तसेच काढणीपश्चात तंत्रज्ञान, निर्यातक्षम फळबागांचे व्यवस्थापन, काढणी पद्धती, निर्यात केल्या जाणाऱ्या मालाची गुणवत्तेची नियमावली, पॅकेजिंग, विविध देशांना हवाई किंवा सागरीमार्गे शेतीमाल निर्यात पाठवण्याचे निकष, हरितगृहातील उत्पादन इत्यादी निर्याती संबंधी असलेल्या महत्त्वाच्या बाबींवर या निर्यात केंद्रातून सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे.
- कृषी निर्यातीला चालना देण्यासाठी किमान अवशेष पातळी (एमआरएल) ब्रँडिंग आणि विपणन, पॅक हाऊस आणि विशेष निर्यात उपचार, देशनिहाय प्रोटोकॉल आणि गुणवत्ता मापदंड, आगाऊ निर्यात प्रमाणपत्रे, शासनाच्या निर्यात योजना आदीं संदर्भात माहिती व मार्गदर्शन केंद्रामार्फत केले जाणार असल्याचे सरंगी यांनी सांगितले.