डिजिटल पेमेंटसाठी इ-रूपीचे लोकार्पण
-
- प्रत्येक डिजिटल पेमेंट व्यवहार अधिक पारदर्शीपणे तसेच सोप्या पद्धतीने व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ ऑगस्ट २०२१ रोजी ‘इ-रूपी’ या नव्या डिजिटल पेमेंट सेवेचे उद्घाटन केले.
- सरकारी सेवा तसेच लाभार्थ्यांना वेळेवर व पारदर्शकपणे लाभ मिळावा यासाठी उचलले हे महत्त्वाचे पाऊल आहे.
- काय आहे इ-रूपी/e-Rupi
-
- इ-रूपी समजावून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. समजा तुमच्या एका मित्राचा/मैत्रिणीचा वाढदिवस आहे आणि तुम्ही भेटवस्तू घ्यायला विसरलात. तर अशावेळी तुम्ही त्यांना एक काहीतरी किंमतीचे इ-व्हाउचर भेट देता. हे व्हाउचर ती व्यक्ती जेव्हा कोणत्याही दुकानात जाईल तेव्हा या इ-व्हाउचरची क्षमता असणारी वस्तू खरेदी करेल. त्याचवेळी त्या व्हाउचरवर जोडलेल्या मोबाईल नंबर अर्थात तो तुमचा असेल त्यावर व्हाउचर वापरल्याची माहिती जाईल. इ-रूपी देखील हे असेच व्हाउचर असेल जे सरकारकडून लाभार्थ्यांना विविध सेवा तसेच लाभ मिळवण्यासाठी दिले जाईल.
- डिजिटल पेमेंट सुविधा, इतिहास आणि भारत
-
- १ जानेवारी २०१३ रोजी नंदन नीलेकणी कार्यदलाच्या शिफारसीनुसार थेट लाभ हस्तांतर योजना अर्थात DBT (Direct Benefit Transfer) योजना सुरू करण्यात आली.
- या योजनेमध्ये सबसिडी थेट बँक खात्यात वर्ग करण्यात येते.
- DBT योजना सुरुवातीला २० जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक स्तरावर करण्यात आली. सुरुवातीला ७ योजनांचा लाभ DBT द्वारे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
- DBTL (पहल) व DBTK (Kerosene) या DBT च्याच उपयोजना आहेत.
- त्यानंतर वित्तीय समावेशनासाठी २८ ऑगस्ट २०१४ ला ‘प्रधानमंत्री जन-धन योजना’ सुरू करण्यात आली. या अंतर्गत वित्तीय साक्षरता वाढण्यासाठी बँक खाती उघडण्यास प्रोत्साहित करण्यात आहे.
- त्यानंतर लाभार्थ्यांपर्यंत तीव्र पोहोच निर्माण व्हावी म्हणून यामध्ये तिसरा घटक ‘मोबाईल’ टाकण्यात आला. त्यामुळे ही योजना JAM त्रिसूत्री (Jandhan-Aadhar-Mobile) या नावाने ओळखली जाते.
- आधारमुळे लाभार्थ्यांची ओळख सुलभ झाली. जन-धन योजनेमुळे हस्तांतरण सुलभ झाले. तर मोबाईलमुळे बँकखाते हाताळता येऊ लागले.
- इ-रूपी हा याच क्रांतीचा एक भाग आहे.
- इ-रूपी प्रणाली
-
- हे प्रीपेड UPI इ-व्हाउचर आहे. जे इच्छित लाभार्थीद्वारेच वापरले जाऊ शकते.
- हे व्हाउचर व्यक्ती-विशिष्ट आणि उद्देश-विशिष्ट आहेत याचा अर्थ ते केवळ इच्छित हेतूसाठीच वापरले जाऊ शकते.
- उदाहरणार्थ, जर ते लसीकरणाच्या उद्देशाने असतील तर ते फक्त लसीकरण केंद्रे अथवा रुग्णालयांमध्येच वापरता येतील.
- वित्तीय सेवा विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांच्या सहकार्याने नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे ही यंत्रणा विकसित करण्यात आली आहे.
- इ-रूपीचे फायदे
-
- लाभ घेण्यासाठी बँक खाते, स्मार्टफोन, कार्ड यांची आवश्यकता भासणार नाही.
- आर्थिकदृष्ट्या मागास भागात सुलभ लाभ पोहोचवणे शक्य. उदाहरणार्थ मेळघाटमध्ये कुपोषित बालकांच्या पालकांच्या पत्त्यावर/मोबाईलवर हा कोड असलेले इ-व्हाउचर पाठवायचे. ती पालक योग्य त्या सरकारी दुकानात जाऊन आवश्यक धान्य आणू शकतील. हे करताना या व्हाउचरचा वापर होईल. तेव्हा लाभार्थ्यांची योग्य ते ओळख प्रमाणपत्र मागितले जाईल.
- मर्यादा
- या व्हाउचरवर इतर लोकांकडून दावा केला जाण्याची शक्यता आहे.