चीनच्या अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये 21 धावपटूंचा गारठून मृत्यू
- लोकांमध्ये सुरक्षा जागृत करण्यासाठी चीनमधील बियानी सिटी येथे मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. परंतु गारांच्या पावसाचा मारा आणि गारांबरोबरच पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे तब्बल 21 खेळाडूंचा गारठून मृत्यू झाला.
- मात्र याच वेळी 151 स्पर्धक व्यवस्थित आहेत व आठ जणांना हलक्या दुखापती झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. सुरक्षा जागृतीच्या या मॅरेथॉन दरम्यान अचानक हवामान बदलले आणि ही घटना घडली. पुढील चौकशीसाठी खास पथक तयार केले असल्याची माहिती बियानी सिटीचे महापौर झँग झुचेन यांनी दिली.
- डोंगरावर सुरू झालेल्या ह्या मॅरेथॉनमध्ये 20 ते 31 किमी अंतर पार केल्यानंतर अचानक हवामान बदलले. हाडे गोठवणारा पाऊस सुरू झाला. थंड वारेही सुरू झाले. धावपटूंना अचानक श्वसनाचा त्रास सुरू झाला. त्यांच्या शरीराचे तापमानही कमी झाले. त्यामुळे शर्यत येथे थांबवावी लागली, अशी माहिती मदत कार्य करणाऱ्यांनी दिली.
- मृतांपैकी एक सुप्रसिद्ध धावपटू किआंग जिंग होता. त्याने यापूर्वी शंभर कि.मी.ची शर्यत जिंकली होती. शर्यतीच्या दिवसासाठी अत्यंत विपरीत हवामानाचा अंदाज नव्हता, असे आयोजकांनी सांगितले. तथापि नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटरच्या शहराच्या स्थानिक शाखेने गेल्या तीन दिवसांपासून गारपीट व जोरदार वाऱ्याचा इशारा दिला होता.
- 172 स्पर्धकांनी या शर्यतीत भाग घेतला होता. बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यासाठी 1200 मदतनीसांची फौज तयार करण्यात आली आहे. दरम्यान तापमानात पुन्हा घट झाल्याने शोध मोहीम मधेच थांबवावी लागली.