चाफेकर बंधू: इतिहासातील धगधगते पान

चाफेकर बंधू: इतिहासातील धगधगते पान 

        भारताचा स्वातंत्र्यलढा अनेक दृष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सशस्त्र क्रांतिकारकांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. त्यामध्येही महाराष्ट्राचा सहभाग अभिमानास्पद असा आहे. 1897 मध्ये पसरलेल्या प्लेगच्या साथीमध्ये तपासणीच्या नावाखाली महिलांवर अत्याचार, निकृष्ट दर्जाचे प्लेग निवारण कार्य करणारा प्लेग कमिशनर कॅप्टन रँड आणि त्याचा सहकारी आयर्स्ट यांच्यावर 22 जून 1897 रोजी बंदुकीने गोळ्या झाडून चाफेकर बंधूंनी केलेल्या वधाची घटना या वर्षी 125 व्या वर्षात पदार्पण करत आहे. मराठी मनांमध्ये अस्मिता जागृत करणारी आणि स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारी चळवळीला चालना देणारी ही घटना इतिहासातील पानांवर कायमची कोरली गेली आहे. 125 व्या वर्षात पदार्पण करत असताना ही घटना कशी घडली, पार्श्वभूमी काय, त्याचे पडसाद कशा प्रकारे उमटले आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याची नौका पुढे नेण्यासाठी या घटनेने कशा प्रकारे प्रेरणा दिली हे आपण या लेखामध्ये पाहूया.

पार्श्वभूमी:

          1896-97 हा काळ खरोखरच भारताच्या आर्थिक दुर्दशेचा काळ होता. त्यावेळी मोठा दुष्काळ पडला होता. “एकोणिसाव्या शतकातील सर्वात महाभयंकर दुष्काळ” असे त्याचे वर्णन केले जाते. या दुष्काळात दोन कोटी लोक मेले असावेत, असे अभ्यासक सांगतात. संकटे यायला लागली, की एकेक येत नाहीत. दुष्काळाच्या पाठोपाठ प्लेगची साथ भारतात फैलावली. महाभयंकर असा हा रोग ज्याच्या तावडीत सापडलेले लोक काही तासात आपले प्राण गमावून बसत. दुष्काळ आणि प्लेग अशी आपत्तीची जोडगोळी पाहून हिंदुस्थान म्हणजे मृत्यूलोकातील खाटीकखाना आहे की काय असे भासू लागले. या प्लेगची वार्ता युरोपात पसरली. हा संसर्ग इकडेही येऊन पोहोचेल, या भीतीने इंग्रज सरकार अस्वस्थ झाले. वाटेल ते करून या प्लेगचा शक्य तितक्या लवकर नायनाट करून टाका, असे आदेश इंग्लंडहून भारतात धडकू लागले.

             या पार्श्वभूमीवर 17 फेब्रुवारी 1897 रोजी पुण्याला कॅप्टन वॉल्टर रँड हा आय.सी.एस अधिकारी प्लेग कमिशनर म्हणून नेमण्यात आला. प्लेगच्या साथीमुळे इंग्रज अधिकारी आणि सैनिक हादरलेले होतेच. यामुळे फ्लेगवर इलाज करून त्याच्यावर नियंत्रण मिळविण्यापेक्षा रयतेला दरडावले जाऊ लागले. प्लेगपीडित रुग्णांना शोधून उपचार करण्याच्या नावावर इंग्रजांनी पुण्यातील घराघरात शोध मोहीम उघडली. अत्याचाराचा कळस गाठला गेला. इंग्रजांविरुद्ध असंतोष पसरू लागला. प्लेग निवारणाच्या नावाखाली घरातल्या पुरुषांना घराबाहेर काढणे, स्त्रियांवर बलात्कार आणि घरातल्या चीजवस्तू उचलून नेणे असे प्रकार गोऱ्या शिपायांनी केले. रँडची माणसे जनतेवर प्लेगपेक्षाही भयानक अत्याचार करू लागली होती. रँड आणि आयर्स्ट हे दोन ब्रिटिश अधिकारी बूट घालूनच देवळात घुसत असत. प्लेग पीडितांना मदत करण्याऐवजी लोकांना मारहाण करणे, त्यांना त्रास देणे हा आपला हक्क समजत असत. एक दिवस लोकमान्य टिळकांनी चाफेकर बंधूंना म्हटले की,

“शिवाजी महाराजांनी कायम अत्याचाराच्या विरोधात लढा दिला. परंतु आज जेव्हा हे इंग्रज निष्पाप जनतेवर अत्याचार करीत आहेत, तेव्हा तुम्ही काय करत आहात?” हृदयाला भेदणारे टिळकांचे हे शब्द आणि रँडच्या अत्याचारामुळे पिचलेल्या भारतीय जनतेचे अश्रू आणि घाबरलेले चेहरे बघून चाफेकर बंधू अस्वस्थ झाले. तेव्हापासून चाफेकर बंधूंनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग अनुसरला.

रँडची हत्या:

       शेवटी 22 जून 1887 हा दिवस उजाडला. शिवाजी उत्सव साजरा करुन नुकतेच १० दिवस पूर्ण झाले होते. पुण्यातल्या गव्हर्न्मेंट हाऊसमध्ये महाराणी व्हिक्टोरियाच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त राज्यारोहणाचा हीरक महोत्सव साजरा केला जाणार होता. पुण्यात प्लेगमुळे जनजीवन विस्कळीत झालेले असूनही हा महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होणार होता. आणि बरेच युरोपियन लोक कार्यक्रमाला येणार होते. ह्या समारंभाला रँड आणि आयर्स्ट हे दोघेही हजेरी लावणार होते.

दामोदर हरी चाफेकर आणि त्यांचे बंधू बाळकृष्ण हरी चाफेकर व त्यांचे मित्र विनायक रानडे पुण्यातील गणेशखिंडीत जेथे हे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तिथे संध्याकाळी साडेसात वाजता आपापली रिव्हॉल्वर घेऊन पोहोचले आणि ह्या दोन अधिकाऱ्यांच्या बाहेर येण्याची वाट बघू लागले.

गणेशखिंडीपासून थोड्या अंतरावर काळोखात उभे राहून ते संधी मिळण्याची वाट बघू लागले. मेजवानी संपल्यानंतर रँड त्याच्या गाडीतून परत जाऊ लागला की “गोंद्या आला रे आला” असे म्हणून एकमेकांना सावध करायचे असे परवलीचे वाक्य ठरले. त्यासाठी वासुदेव चाफेकरांना मागावर पाठवले. मेजवानी झाल्यानंतर रँड आणि आयर्स्ट बाहेर आले आणि चाफेकरांना “गोंद्या आला रे आला” असा संकेत मिळताच बाळकृष्णपंतांनी आयर्स्टच्या डोक्यावर पिस्तूल झाडलं.

         परंतु वासुदेवपंत अजूनही “गोंद्या आला रे आला” अशी आरोळी देतच होते.तेव्हा बाळकृष्णपंतांनी गोळी लागल्यावर माणूस कोसळताना बघितले पण तो नेमका आयर्स्ट होता कि रँड हे लक्षात आले नाही. इकडे वासुदेवपंतांची आरोळी ऐकून दामोदरपंताच्या लक्षात आले रँड समजून दुसऱ्याच अधिकाऱ्याला मारण्यात आले आहे. तोच त्यांना रँडची गाडी आणि त्यापाठोपाठ गाडीमागे पळणारे वासुदेवपंत दिसले. त्यांनी अजिबात वेळ न दवडता पिस्तुलाचा चाप ओढला आणि रँडच्या पाठीत गोळी लागून तो बेशुद्ध झाला. त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तो थोडा शुद्धीवर आला देखील पण त्याला काहीही जबाब देता आला नाही आणि तो ३ जुलै १८९७ रोजी मरण पावला. चाफेकर बंधू आणि रानडे तेव्हा तिथून निसटण्यात यशस्वी झाले.

चाफेकर बंधूंना फाशी:

      आपले दोन अधिकारी असे मारल्या गेल्याचे बघून ब्रिटिशांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी रँड आणि आयर्स्ट ह्यांच्या खुन्याबद्दल माहिती देणाऱ्याला वीस हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. फितुरीमुळे आपल्या देश पारतंत्र्यात गेला, आणि त्याच फितुरीमुळे चाफेकर बंधूनासुद्धा अटक झाली. गणेश व रामचंद्र द्रविड ह्या द्रविड बंधूंनी चाफेकर बंधूंबद्दल सरकारला माहिती दिली. ह्याचा बदला धाकटे वासुदेवपंत ह्यांनी घेतला. त्यांनी ८ मे १८९९ च्या रात्री द्रविड बंधूंचा वध केला. दामोदरपंत चाफेकर ह्यांना १८ एप्रिल १८९८ रोजी व बाळकृष्णपंत ह्यांना १२ मे १८९८ रोजी येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली.

        जुलै रोजी टिळकांना राजद्रोहाच्या आरोपावरून मुंबईत पकडले गेले. खरे निमित्त रँडवधाचे होते. कारण त्यांनी “सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?” या नावाचा लेख केसरीमध्ये लिहिला होता. याद्वारे टिळकांच्या जहाल राष्ट्रवादी राजकारणाला आळा घालण्याचा इंग्रजांचा डाव होता. टिळकांना दीड वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली गेली.

चाफेकर बंधूंविषयी:

      चाफेकर बंधू हे पुण्याजवळील चिंचवड गावात राहत होते. स्वातंत्र्याच्या लढ्यात आहुती टाकणाऱ्या दामोदर हरी चाफेकर ह्यांचा जन्म २५ जून १८६९ रोजी पुण्यातल्या चिंचवड गावात झाला. त्यांचे वडील हरिपंत चाफेकर हे प्रसिद्ध कीर्तनकार होते.

दामोदर चाफेकर हे हरिपंतांचे ज्येष्ठ पुत्र होते. बाळकृष्ण चाफेकर व वासुदेव चाफेकर हे दामोदर चाफेकरांचे धाकटे बंधू होते. दामोदरपंतांची लहानपणापासून सैन्यात जाण्याची इच्छा होती. त्यांचे वडील अत्यंत ज्ञानी व्यक्ती होते त्यामुळे साहजिकच तो ज्ञानाचा वारसा त्यांच्या तिन्ही पुत्रांमध्ये आला होता. लोकमान्य टिळकांना ते गुरु मानत असत, तसेच महर्षी पटवर्धन त्यांचे आदर्श होते. लोकमान्य टिळकांकडून प्रेरणा घेऊन त्यांनी युवकांचे एक व्यायाम मंडळ तयार केले. लहानपणापासूनच त्यांच्या मनात ब्रिटिश सरकारविषयी चीड होती. दामोदरपंतांनीच मुंबईत व्हिक्टोरिया राणीच्या पुतळ्याला काळे फासून पुतळ्याच्या गळ्यात चपलांचा हार घालून ब्रिटिश सरकारविषयी आपला राग व्यक्त केला होता. १८९४ सालापासून चाफेकर बंधूंनी पुण्यात गणेशोत्सव व शिवजयंती साजरी करणे सुरू केले.

चाफेकर बंधूंच्या ह्या अतुलनीय त्याग व शौर्याबद्दल त्यांना विनम्र अभिवादन! 

क्रांतिकारक वध केलेला इंग्रज अधिकारी वर्ष
चाफेकर बंधू रँड १८९७
अनंत कान्हेरे न्या. आर्थर जॅक्सन १९०९
मदनलाल धिंग्रा कर्झन वायली १९०९
शेर अली (पठाण) लॉर्ड मेयो १८७२

 

 

Contact Us

    Enquire Now