गैरसैन उत्तराखंडची उन्हाळी राजधानी
- उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील गैरसैनला राज्याची उन्हाळी राजधानी म्हणून राज्यपालांनी मान्यता दिली.
- राज्यघटनेच्या कलम ३४८ मधील उपकलम ३ मधील तरतुदीनुसार मान्यता देण्यात आली आहे.
- डेहराडून ही राज्याची हिवाळी राजधानी असणार आहे.
- शिमला आणि धरमशाला अशा हिमाचल प्रदेशच्या २ राजधान्या आहेत. उत्तराखंड हे दोन राजधान्या असणारे दुसरे राज्य ठरले आहे.
- वर्ष २००० मध्ये उत्तर प्रदेश राज्याचे विभाजन करून उत्तराखंड राज्याची निर्मिती करण्यात आली. उत्तराखंड राज्यात कुमाऊँ आणि गढवाल असे दोन विभाग आहेत. या दोन विभागांमध्ये वसलेले गैरसैन हे राजधानीसाठी योग्य आहे असे प्रतिपादन करण्यात येत होते.
- राज्य स्थापन झाल्यानंतर डेहराडूनला तात्पुरत्या राजधानीचा दर्जा देण्यात आला होता. २००१ साली स्थायी राजधानीच्या शोधासाठी, त्यासाठीच्या शिफारसी करण्यासाठी व्ही.एन.दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली.
- या समितीने पाच ठिकाणांचा राजधानीसाठी विचार केला. ऋषिकेश, रामनगर, काशीपूर, गैरसैन आणि डेहराडून. यासाठी भौगोलिक परिस्थिती तसेच लोकसंख्या या प्रमुख घटकांचा विचार करण्यात आला होता.
- गैरसैन हे ठिकाण डेहराडूनपासून २७० किमी अंतरावर आहे. समुद्रसपाटीपासून ५,४१० फूट उंचीवर आहे. दुधातोली पर्वत रांगेच्या पूर्व बाजूला आहे. रामगंगा नदीचा उगम या परिसरात होतो.