कोरोना संदर्भात सरकारवर ‘लॅन्सेट’ नियतकालिकांची परखड टीका
- ट्विटरवर टीका करणाऱ्यांना रोखण्यापेक्षा कोविडला रोखण्यावर सरकारने भर द्यायला हवा होता, अशी टीका जगप्रसिद्ध वैद्यकीय संशोधन नियतकालिक ‘लॅन्सेट’ने मोदी सरकारवर केली आहे.
- खुल्या चर्चेला रोखण्याचा प्रयत्न आणि स्वत:वरची टीका यामुळे ते माफीला पात्र नाहीत, असे परखड मत ‘लॅन्सेट’मध्ये मांडण्यात आले आहे. भारतात १ ऑगस्टपर्यंत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या दहा लाखांपर्यंत पोहोचू शकते, असे मत इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मॅट्रिक्स अँड इव्हॅल्युएशनने व्यक्त केले.
- सरकार आपल्या चुका मान्य करणार का यावर नव्या धोरणाचं यश अवलंबून असेल. सुरुवातीच्या टप्प्यात कोरोनावर नियंत्रण मिळवल्यानंतर सरकारच्या कृती दलाची बैठकच झाली नाही, त्याचे परिणाम आपल्या समोर आहेत. देशाला पारदर्शी नेतृत्व देणार का हाही मुद्दा आहे, असे लॅन्सेटमध्ये म्हटले आहे.
- पहिल्या लाटेतील यशामुळे भारत हुरळून गेला, परिणामी जे यश मिळाले त्यावर पाणी फिरले गेले. सरकारवरील ट्विटर टीका दडपण्याची कृती, सरकारने साथीचा मुकाबला करण्यात मानलेली आत्मसंतुष्टता, विषाणू साथ असतानाही निवडणूक प्रचारसभा, त्यात कोरोना नियमांचे उल्लंघन, धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देण्याची चूक इत्यादी चुका सरकारने केल्या आहेत. ऑगस्टपर्यंत मृतांची संख्या वाढली तर मोदी सरकारने ओढवून घेतलेले संकट ठरेल, अशी टीकाही करण्यात आली.
- वैज्ञानिक आधारावर सार्वजनिक आरोग्याशी निगडीत उपाययोजना करायला लागतील. जोपर्यंत लसीकरण वेगाने सुरू होत नाही तोवर कोरोनाला रोखण्यासाठी सर्वतोपरी पाऊले उचलायला हवीत, असे लॅन्सेटने म्हटले आहे.
- जिनोम सिक्वेंसिंगवर भर द्यायला हवा, वाढत चाललेल्या रुग्णांच्या संख्येबाबत सरकारने डेटा उपलब्ध करून द्यायला हवा. दर पंधरा दिवसांनी नेमकं काय घडतं याची माहिती नागरिकांना द्यायला हवी. अंमलात आणलेल्या उपाययोजनांची माहितीही नागरिकांना द्यावी, देशव्यापी लॉकडाऊन संदर्भात चर्चा व्हायला हवी.
- ग्रामीण भागात ६५ टक्के लोक राहतात. त्यांच्यापर्यंत आरोग्याच्या सोयीसुविधा पोहोचविण्यासाठी सरकारला स्थानिक आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बरोबरीने काम करावे लागेल. लसीकरणाला गती देणे आवश्यक आहे. कोरोना विरुद्ध लढण्यासाठी केरळ आणि ओदिशा ही राज्ये अधिक क्षमतेने तयार होती, असे लॅन्सेटने म्हटले आहे. मात्र वैद्यकीय सोयीसुविधा अभावी महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश दुसऱ्या लाटेसाठी तयार नव्हते. अंत्यसंस्कारासाठीही प्रतीक्षा करावी लागते. इतकी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.
- लोक कोरोना नियमांच्या पालनासंबंधी गंभीर आहेत का यासंबंधी मतही लॅन्सेटमध्ये मांडण्यात आले आहे. क्वारंटाईन आणि चाचण्या योग्य पद्धतीने होत आहेत का याकडे लक्ष द्यावे लागेल. यामध्ये केंद्र सरकारची भूमिका महत्त्वाची असेल.