केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग विभागाच्या अहवालानुसार पादचाऱ्यांच्या मृत्यूत महाराष्ट्र देशात दुसरा
- देशात पादचाऱ्यांच्या अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग विभागाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात स्पष्ट केले. शहरांतील रस्त्यांची लांबी आणि रुंदी वाढत असताना पादचारी असुरक्षित होत असल्याचे या अहवालात पुन्हा एकदा दिसून आले आहे.
- वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन न करणे, धोकादायक पद्धतीने वाहने चालवणे, मद्यपान करून वाहन चालवणे, वाहने भरधाव चालविणे, रस्ते बांधणीतील त्रुटी, लेनच्या शिस्तीचा अभाव, इत्यादी कारणांमुळे अपघात वाढत असल्याचे अहवालात म्हटले आहे.
- मागील पाच वर्षांत मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्यांची संख्या आता दुप्पट झाली आहे. २०१९ मध्ये सर्वाधिक पादचारी मृत्युमुखी पडले आहेत. पादचाऱ्यांच्या मृत्यूंच्या प्रमाणात देशात पश्चिम बंगाल पहिला तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. अनेक शहरात सुरक्षित पदपथ नसल्यामुळेही समस्या वाढल्या असल्याचे अहवालात म्हटले आहे.
- ‘इंडियन रोड काँग्रेसने’ (आय आर सी) रस्ते हे प्रथमत: पादचाऱ्यांसाठी आहेत हे तत्त्व लक्षात घेऊन पादचारी पूरक सुविधा निर्माण करण्याची सूचना केंद्र सरकार व सर्व राज्यांना केली आहे.
- पादचाऱ्यांपेक्षा वाहने महत्त्वाची या सामाजिक आणि प्रशासकीय मानसिकतेमध्ये बदल व्हावा, यासाठी सातत्याने सामूहिक प्रयत्नांची गरज आहे, असे ‘परिसर’ या स्वयंसेवी संस्थेचे सुजित पटवर्धन म्हणाले.
- पादचाऱ्यांची सुरक्षितता वाढविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनाही मनापासून प्रयत्न करण्याची गरज आहे कारण अनेक राज्यांमध्ये पादचाऱ्यांचे अपघात वाढत आहेत. त्याचे प्रतिबिंब हे केंद्र सरकारच्या अहवालात उमटले असल्याचेही पटवर्धन यांनी सांगितले.
- २०१९ या वर्षात देशात २५,८५८ पादचाऱ्यांचा मृत्यू झाला. २०१८ साली ही संख्या २२,८५६ होती.
प्रमुख राज्यातील पादचारी मृत्यू
१. पश्चिम बंगाल – २९३३
२. महाराष्ट्र – २८४९
३. कर्नाटक – १८८०
४. उत्तर प्रदेश – १७७२
५. आंध्र प्रदेश – १७२३
- या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी पादचारी-पूरक सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. यासाठी राष्ट्रीय पादचारी धोरण आवश्यक असून त्यांची काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.