आसाम भूकंप

आसाम भूकंप

 • भारतातील ईशान्येकडील भूभाग भूकंपाच्या दृष्टीने अत्यंत सक्रिय असून नुकताच 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आसाम आणि ईशान्येकडील भागात जाणवला.
 • नॅशलन सेंटर फॉर सेस्मॉलॉजी (NCS) यांच्या अहवालानुसार, हिमालयीन फ्रंटल थ्रस्ट (HFT)च्या जवळील ‘कोपली फॉल्ट झोन’   हे या भूकंपाचे मुख्य कारण असल्याचे मानले जाते.
 • NCS ही देशातील भूकंपांच्या घटनांवर नजर ठेवणारी भारत सरकारची नोडल एजन्सी असून ती पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते.

मुख्य मुद्दे – 

हिमालयीन फ्रंटल थ्रस्ट (HFT)

 • हिमालयीन फ्रंटल थ्रस्ट ज्याला मुख्य फ्रंटल थ्रस्ट म्हणूनही ओळखले जाते, हा एक भूगर्भीय भ्रंश / प्रस्तरभंग आहे जो भारतीय आणि युरेशियन भूपट्टावर स्थित आहे.

कोपली फॉल्ट झोन 

 • कोपली फॉल्ट झोन या 300 किमी लांब आणि 50 किमी रुंद असलेल्या भूभागाचा विस्तार भूतान, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मणिपूरच्या पश्चिम भागात झाला आहे.
 • भूपट्ट भूकंपाच्या घटनांशी संबंधित हे भूकंपग्रस्त क्षेत्र V (पाच) मध्ये आढळणारे अत्यंत सक्रिय भूकंपक्षेत्र आहे.
 • या क्षेत्रात भारतीय प्लेट युरेशियन प्लेटच्या खाली असल्याने येथे भूकंपाचे धक्के तीव्र जाणवतात.
 • हिमालयीन पट्टा आणि सुमात्रा पट्टा या दोघांमध्ये आघात होत असल्याने ईशान्येकडील भूभाग भूकंपाच्या दृष्टीने अत्यंत हिंसक मानला जातो.

भारतातील भूकंप मॅपिंग

 • सक्रिय  (घडी पर्वत) हिमालय पर्वतरांगांच्या उपस्थितीमुळे भूकंपग्रस्त देशांमध्ये भारताचे नाव अग्रस्थानी आहे.
 • भूकंप आणि भूपट्टांच्या धक्क्यांवरील भूकंपाच्या आधारे भारत चार भूकंपांच्या क्षेत्रामध्ये (II, III, IV, V) विभागलेला आहे.
 • सुरुवातीला भूकंपाच्या तीव्रतेच्या संदर्भात भूकंप क्षेत्र पाच भागात विभागले गेले होते, परंतु भारतीय मानक ब्यूरो (BIS)ने प्रथम दोन विभागांना एकत्रित केल्याने आता एकूण चार क्षेत्रे अस्तित्वात आहेत.
 • भूकंपग्रस्त भागातील नकाशे आणि कोड प्रकाशित करण्यासाठी BIS ही संस्था कार्यरत आहे.
 • भूकंपक्षेत्र II – किरकोळ नुकसान भूकंपाचा पट्टा, जेथे mm च्या प्रमाणात V ते VI पर्यंतची तीव्रता असते.
 • भूकंपक्षेत्र III – mm स्केल तीव्रता सातव्याशी (VII) संबंधित मध्यम नुकसान क्षेत्र
 • भूकंपक्षेत्र IV – mm स्केल तीव्रता सातव्याशी (VII) संबंधित जास्त नुकसान क्षेत्र
 • भूकंपक्षेत्र V – भूकंपक्षेत्र V हा भूकंपाच्या दृष्टीने सर्वाधिक संवेदनशील असा प्रदेश आहे, जेथे सर्वात तीव्र भूकंप पाहिले गेले आहेत.
 • या भागांमध्ये 7 रिश्टर स्केल पेक्षा जास्त तीव्रतेचे भूकंप पाहिले गेले असून ते mm स्केल IX च्या तुलनेत जास्त तीव्र आहेत.

भूकंप

 • भूकंप म्हणजे पृथ्वीच्या भूकवचाचे कंपन होय.
 • बरेचसे भूकंप भूपट्ट हालचालींशी संबंधित असतात, तर काही वेळेस ज्वालामुखीच्या उद्रेकामुळेही भूकंप निर्माण होतात.

भूकंप नाभी

 • भूकवचातील ज्या विक्षोभ स्थानापासून भूकंप लहरी उगम पावून सर्वदूर संचरित होतात, त्या स्थानास भूकंप केंद्र किंवा नाभी असे म्हणतात.

अधिकेंद्र

 • भूकंप केंद्राच्या – नाभीच्या वर क्षितिजतलाच्या लंब रेषेवर पृथ्वीच्या पृष्ठभागावर जो बिंदू मिळतो, त्याला अधिकेंद्र असे म्हणतात.
 • अधिकेंद्रापासून जसजसे अंतर वाढत जाते, तसतशी भूकंपाची तीव्रता कमी होत जाते.

रिश्टर प्रमाण 

 • भूकंप लहरींची तीव्रता मोजण्यासाठी उपयोग.
 • याच्या सहाय्याने भूकंपाच्या तीव्रतेची सातत्याने नोंद घेतली जाते, त्यास भूकंपलेख (Seismograph) म्हणतात.
 • त्याची कक्षा 1 ते 9 दरम्यान असते.

भूकंपाचे प्रकार

 

 • भूकंपनिर्मितीच्या आधारावर भूकंपाचे प्रकार :

 

अ. ज्वालामुखीय भूकंप

ब. पातालिक भूकंप

क. प्रस्तरभंग आणि भ्रंशीय भूकंप

 

 • भूकंपकेंद्र / नाभीच्या खोलीवर आधारित भूकंपाचे प्रकार :

 

अ. उथळ खोलीवरील भूकंप – भूकवचाच्या खाली 70 कि.मी. पेक्षा कमी अंतरावर

ब. मध्यम खोलीवरील भूकंप – भूकवचाच्या खाली 70 कि.मी. ते 350 कि.मी. खोली दरम्यान

क. खोल नाभी भूकंप – भूकवचाच्या खाली 300 ते 700 कि.मी. खोली दरम्यान

भ्रंश / प्रस्तरभंग (Fault) :

 • भूकवचावर भूगर्भीय हालचालींमुळे एका ठिकाणी दाब पडतो तर दुसऱ्या ठिकाणी तणाव निर्माण होतो.
 • यामुळे खडकावर तडे / भेगा पडतात. या क्रियेमुळे काही भाग भ्रंश पातळीच्या खाली खचले जातात तर काही भाग वर उचलले जातात. यालाच भ्रंश / प्रस्तरभंग म्हटले जाते.

भ्रंशाचे प्रकार :

 1. सामान्य भ्रंश – गुरुत्वाकर्षणाच्या तत्त्वानुसार खडकाचे स्थानांतर होते, याला सामान्य भ्रंश असे म्हणतात. या भ्रंशामुळे खडकाचा मूळ विस्तार वाढतो.
 2. व्युत्क्रम भ्रंश (Reserve Fault) – भ्रंश पातळीवर खडकाचे भाग एकमेकांकडे सरकतात. ही क्रिया गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने होते. या क्रियेमुळे मूळ खडकाचा विस्तार कमी होतो.
 3. पार्श्वीय / नतीलंब सर्पण भ्रंश (Lateral / Strike Slip Fault) – खडकाच्या भागांचे स्थानांतर उभ्या दिशेने न होता क्षितिज समांतर दिशेने होते. याला अपक्षय भ्रंश असेही म्हणतात.

भ्रंशामुळे निर्माण होणारी भूरूपे :

 1. अवरोधी पर्वत
 2. खचदरी

 

Contact Us

  Enquire Now