अध्यक्षपदी रुजू होताच बायडेन यांनी घेतले १५ महत्त्वाचे निर्णय
- अमेरिकेच्या ४६व्या राष्ट्राध्यक्षपदी डेमोक्रॅटिक पक्षाचे जोसेफ बायडेन यांनी शपथ घेतली. पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर बायडेन यांनी १५ कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी केली.
- डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात घेण्यात आलेले काही महत्त्वाचे निर्णय त्यांनी मागे घेतले आहेत. त्यामध्ये अमेरिकेत कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता मास्कचा वापर करणे अनिवार्य केले, मुस्लिम देशांवरील प्रवास बंदी हटविण्यात आली तसेच पॅरिस हवामान करारात पुन्हा सामील होण्यासाठी बायडेन यांनी मान्यता दिली आहे.
- बायडेन यांनी घेतलेले निर्णय म्हणजे ट्रम्प यांनी केलेल्या नुकसानीची भरपाई असल्याचे त्यांच्या टीमने सांगितले. ट्रम्प यांनी घेतलेले वादग्रस्त निर्णय यामुळे काही वेळेस अमेरिका एकाकी पडल्याचे निर्माण झालेले चित्र पुसण्याचे काम बायडेन सरकार करेल, असेही सांगण्यात आले.
- जागतिक आरोग्य संघटनेशी तोडलेले संबंध पुन्हा प्रस्थापित करण्याचा निर्णयही बायडेन यांनी घेतला. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटारिओ गुटेरेस यांनी या निर्णयाचे स्वागत केले. कोरोना काळात परस्पर सहकार्यासाठी हा निर्णय अतिशय महत्त्वाचा ठरणार असल्याचेही गुटेरेस म्हणाले.
- मेक्सिकोच्या सीमेवर सुरू असलेले कुंपण भिंतीचे बांधकाम थांबविण्याचा आदेश बायडेन यांनी दिला. तसेच त्यांनी पॅरिस कराराबाबतचे स्वीकारपत्र संयुक्त राष्ट्राच्या सरचिटणीसांकडे सोपविले आहे.
- अमेरिकेसाठी पॅरिस करार १९ फेब्रुवारीला लागू होणार आहे.
बायडेन यांनी घेतलेले १५ निर्णय थोडक्यात
१. पॅरिस करारात अमेरिका पुन्हा सामिल होईल.
२. जागतिक आरोग्य संघटनेत अमेरिका पुन्हा सामिल होईल.
३. मुस्लिमांना अमेरिकेत येण्यावर घातलेली बंदी उठवण्यात आली आहे.
४. मेक्सिकोच्या सीमेवर सुरू असलेले भिंतीचे काम तात्काळ थांबविण्यात आले आहे.
५. अमेरिकेत सर्व नागरिकांनी मास्क व सोशल डिस्टन्सिंग पाळावे.
६. येणारे १०० दिवस जनतेने मास्क परिधान करावा.
७. समानता राखून आणि वंशद्वेषाला बाजूला सारून यापुढे सर्व निर्णय घेण्यात येतील.
८. कोरोना पार्श्वभूमीवर उपाययोजनेसाठी समन्वयकाचे पद निर्माण करण्यात आले आहे. तसेच जागतिक आरोग्य सुरक्षा विभाग हा कायम ठेवण्यात येणार आहे.
९. बायडेन सरकारच्या धोरणाप्रमाणे स्थलांतरितांविषयी धोरणे आखली जातील.
१०. वैध कागदपत्रे नसणार्या स्थलांतरितांना जनगणनेतून वगळण्याचा निर्णय रद्द करण्यात आला.
११. विविध खात्यांतील नियंत्रकांच्या कामकाजाचा आढावा घेण्याची ट्रम्प यांची पद्धत बदलण्यात येईल.
१२. अवैधरीत्या लहानपणी अमेरिकेत आलेल्यांना संरक्षण न देण्याचा ट्रम्प यांचा निर्णय बदलण्यात आला आहे.
१३. सरकारी अधिकार्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जातील.
१४. अमेरिकी विद्यार्थ्यांनी कर्ज परतफेड करण्यावरील स्थगितीला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ.
१५. कोणत्याही कारणाने बेदखल करणे किंवा त्यासंबंधी इतर कारवाई करण्यास मुदतवाढ दिली आहे.
- जनतेला जी वचने, आश्वासने दिली आहेत ती कसोशीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. मी घेतलेले हे १५ निर्णय महत्त्वाचे असले तरी अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. अजून काही गोष्टींबद्दल पावले उचलण्यात येणार असल्याचे बायडेन यांनी सांगितले.
- वर्णद्वेष आणि कटुता निर्माणकारी मानसिकतेला हरविण्याच्या लढाईत अमेरिकन जनतेला सहभागी होण्याचे आवाहनही बायडेन यांनी केले. हा एका उमेदवाराचा विजय नसून लोकशाहीचा उद्देश आणि लोकशाहीचा विजय असल्याचेही बायडेन म्हणाले.