ऋषभ पंतला आयसीसीचा पहिला ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कार जाहीर

ऋषभ पंतला आयसीसीचा पहिला ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कार जाहीर

 

  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (आयसीसी) ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कार जाहीर झाला आहे. आयसीसीने याच वर्षी या पुरस्काराची सुरुवात केली आहे. त्यामुळे ऋषभ पंत हा पुरस्कार मिळवणारा पहिला खेळाडू ठरला.

 

  • या पुरस्काराद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पुरुष आणि महिला खेळाडूला संपूर्ण वर्षभर मान्यता मिळेल. या पुरस्कारासाठी ऋषभ पंत सोबत इंग्लंडचा कर्णधार जो रूट आणि आर्यलंडचा पॉल स्टर्लिंग हे दोघे शर्यतीत होते. महिलांमध्ये दक्षिण आफ्रिकेची शबनम इस्माइलने हा पुरस्कार पटकावला. शबनम इस्माइलसोबत पाकिस्तानची डायना बेग आणि दक्षिण आफ्रिकेचीच मेरीझॅन पॅप ह्या दोघी शर्यतीत होत्या.
  • ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना २३ वर्षीय ऋषभ पंतने तिसऱ्या कसोटीत ९७ धावांची धडाकेबाज फलंदाजी केली होती. तर चौथ्या कसोटीत त्याने नाबाद ८९ धावा करत भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्याच्या याच कामगिरीमुळे त्याला जानेवारी २०२१ या महिन्यासाठी या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्याने चार डावात २४५ धावा केल्या. तसेच त्याने चार झेल घेतले आहेत. एका सामन्यात तो सामनावीरही ठरला.
  • प्रत्येक महिन्याला आयसीसी पुरुष व महिला अशा दोन्ही प्रकारात महिन्यातील तीन सर्वोत्तम खेळाडूंना नामांकन देते. आयसीसी मतदान समितीकडे ९० टक्के तर चाहत्यांकडे १० टक्के मतदानाचे अधिकार असतात. यामध्ये खेळाडूचा पराक्रम, वावर आणि महिन्यात केलेले विक्रम अशा बाबींचा विचार केला जातो.
  • चाहत्यांचे आभार मानत ऋषभ पंतने अशा प्रकारच्या पुरस्काराने युवा खेळाडूंना प्रेरणा मिळते. ऑस्ट्रेलियातील या विजयात योगदान देणाऱ्या संघातील सर्व सहकाऱ्यांना हा पुरस्कार समर्पित असल्याचे त्याने सांगितले.

Contact Us

    Enquire Now