आयपीसीसीचा सहावा अहवाल आणि हवामान बदल

आयपीसीसीचा सहावा अहवाल आणि हवामान बदल

  • सदर लेख लिहीत असताना अल्जेरिया या उत्तर आफ्रिकेतील देशामध्ये जंगलांमध्ये  लागलेल्या भीषण आगीत एकूण ६५ जणांचा मृत्यू झाला आहे. आठवडाभरापूर्वी ५ ऑगस्टला टर्कीमध्ये  प्रचंड मोठ्या प्रमाणात जंगली आगी लागल्या. मागील दोन महिन्यांचा आढावा घेतल्यास अमेरिकेमध्ये २०० लोकांचा उष्णतेच्या लाटेमुळे जीव गेला. तसेच अमेरिकेच्या पश्चिम तटावर असलेल्या कॅलिफोर्नियामध्ये पूर्वी कधीही न अनुभवलेल्या भीषण आगी तेथील जंगलांमध्ये लागल्या. शिवाय अमेरिकेतील १४ राज्यांमध्ये एकूण १०७ ठिकाणी जंगलांमध्ये वणवे पेटले आहेत. उच्च अक्षांशावर थंड प्रदेशांमध्ये येणाऱ्या कॅनडा या देशामध्ये  तापमान ५० अंश सेल्सिअस एवढे उच्च नोंदले गेले. उष्णतेच्या लाटेमुळे तेथे सुमारे २३३ लोकांचा मृत्यू झाला. उच्च तापमान असलेल्या पाण्यामुळे जवळपास एक दशलक्ष शेलफिश समुद्रामध्ये मरण पावले. ग्रीसमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे वणवे जंगलांमध्ये लागले आहेत. रशिया (मुख्यतः सायबेरिया) येथे सुद्धा हीच परिस्थिती आहे. जर्मनी, इटली,बेल्जियम आणि चीन येथे विध्वंसक प्रकारची पूरपरिस्थिती निर्माण झाली. चीनमध्ये तर मागच्या दोन-तीन वर्षांपासून पूर्वीच्या हजार वर्षांमध्ये कधीही न पाहिलेली अशी पर्जन्यवृष्टी आणि पूरस्थिती निर्माण होत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये अनेक संख्येने ‘मिनी टोर्नेडो’ बघायला मिळत आहेत. दुबईमध्ये तर कृत्रिम पावसाद्वारे असह्य असा उकाडा कमी करावा लागला. कझाकिस्तान मागील तीन वर्षांपासून भीषण अशा दुष्काळाला तोंड देत आहे. या दुष्काळाचा परिणाम म्हणून तेथे शेकडो घोडे मृत्युमुखी पडले आहेत. भारतातील परिस्थिती तर आपण बघतच आहोत. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये कोसळणाऱ्या दरडीची वारंवारिता वाढलेली आहे. ७ फेब्रुवारीला उत्तराखंडमध्ये चमोली जिल्ह्यात हिमदरड कोसळल्याने  ऋषिगंगा नदीला अचानक पूर आला आणि त्यात प्रचंड जीवित व वित्तहानी झाली. तसेच देशात अनेक ठिकाणी प्रचंड मोठे पूर आलेले आहेत.
  • या सर्व पार्श्वभूमीवर सोमवारी ९ ऑगस्टला हवामान बदलावरील आंतरशासकीय  पॅनलद्वारे (आयपीसीसी) जाहीर करण्यात आलेल्या सहाव्या मूल्यमापन अहवालाचा पहिला भाग अतिशय बोलका आणि वास्तवाची जाणीव करून देणारा आहे.
  • आयपीसीसी (Intergovernmental Panel on Climate Change)  हे व्यासपीठ १९८८ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) आणि जागतिक हवामानशास्त्र संघटना (WMO) यांनी संयुक्तरीत्या स्थापन केले.
  • यामध्ये १३० पेक्षा जास्त देशांमधील २,५०० पेक्षा जास्त पर्यावरणतज्ञ व शास्त्रज्ञांचा समावेश आहे.
  • आयपीसीसीचे मुख्य कार्य जागतिक हवामानाबद्दल अचूक आकलन करणे तसेच मानवी गतिविधीचा जागतिक हवामानावरील परिणाम यांचा अभ्यास करणे हे आहे.
  • यासंबंधी आयपीसीसी एक अहवाल प्रसिद्ध करत असते. या अहवालास ‘मूल्यांकन अहवाल’ (Assessment Report) असे म्हणतात.
  • असा पहिला अहवाल १९९०मध्ये प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर १९९५, २००१, २००७ आणि २०१४ असे एकूण ४ अहवाल प्रसिद्ध झाले.
  • सध्या प्रसिद्ध झालेला अहवाल हा सहाव्या अहवालाचा पहिला भाग असून त्याचे शीर्षक “क्लायमेट चेंज २०२१- द फिजिकल सायन्स बेसिस” असे आहे.
  •  अहवालाबद्दल माहिती घेण्यापूर्वी हवामान बदलासंदर्भात झालेल्या जागतिक प्रयत्नांची व महत्त्वाच्या घटनांची पार्श्वभूमी जाणून घेणे अगत्याचे ठरेल.

पार्श्वभूमी :

    • ५ ते १६  जून 1972 : स्टॉकहोम (स्वीडन) येथे संयुक्त राष्ट्रसंघाची मानवी पर्यावरण परिषद आयोजित. या परिषदेमध्ये पहिल्यांदा आर्थिक विकासामध्ये पर्यावरणाचा विचार करण्यात आला.
    • १९८० : जागतिक संवर्धन डावपेच (World Conservation Strategy) : ‘शाश्वत विकास’ या संकल्पनेचा पहिल्यांदा उच्चार
    • १९८३ :जागतिक पर्यावरण व विकास आयोग. संयुक्त राष्ट्रसंघाद्वारा नॉर्वेच्या पंतप्रधान ग्रो हार्लेम ब्रूटलँड यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन. या आयोगाने १९८७मध्ये प्रसिद्ध केलेल्या ‘अवर कॉमन फ्युचर’ या अहवालात शाश्वत विकासाची व्याख्या सर्वप्रथम केली.
    • ३ ते १४ जून १९९२ : रियो परिषद किंवा वसुंधरा परिषद. या परिषदेमध्ये पर्यावरणासंबंधी महत्त्वाच्या पाच करारांचा स्वीकार करण्यात आला. ज्यामध्ये रिओ घोषणापत्र, जैवविविधता अभिसंधी (CBD), संयुक्त राष्ट्रसंघाची पर्यावरण बदलावर अभिसंधी चौकट (UNFCCC), वनसंवर्धन तत्त्वावरील करार आणि अजेंडा २१ यांचा समावेश होता.
    • १९९५ : बर्लिन येथे UNFCCC अंतर्गत पहिली पर्यावरण परिषद आयोजित. या परिषदेमध्ये हरितगृह वायू-उत्सर्जन नियंत्रणात ठेवण्यासाठी बर्लिन आदेश (Berlin mandate) संमत
    • १९९७ : क्योटो प्रोटोकॉल स्वीकारला गेला.
    • २००२ : दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे रिओ + १० परिषद
    • २०१२ : रिओ दि जानेरो येथे रिओ + २० परिषद
    • २०१४ : आयपीसीसीचा पाचवा अहवाल प्रसिद्ध 
    • २०१५ :  पॅरिस येथे क्योटो कराराला पर्याय म्हणून १९६ देशांनी पॅरिस करार  स्वीकारला.
    • सध्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आयपीसीसीच्या अहवालातील काही ठळक मुद्दे खालीलप्रमाणे :
    • समुद्र,  जमीन आणि वातावरणाच्या तापमान वाढीला मानवी  हस्तक्षेप हा स्पष्टपणे कारणीभूत आहे.
    • मानवी हस्तक्षेपामुळे अभूतपूर्व दराने वातावरण गेल्या २००० वर्षांमध्ये गरम झाले आहे. 
    • मागील चार दशकांपैकी प्रत्येक दशक हे अगोदरच्या दशकांपेक्षा अधिक उष्ण ठरलेले आहे.
    • २०११-२०२० या दशकात तापमानामध्ये १८५० सालाच्या तुलनेत १.०९ अंश सेल्सियस एवढी वाढ झाली आहे. हे दशक  गेल्या १,२५,००० वर्षांमधील सर्वात उष्ण दशक ठरले आहे. 
    • पुढील एक ते दोन दशकांमध्ये पॅरिस करारामध्ये मान्य झालेली १.५ अंश सेल्सियसची मर्यादा  पार होण्याची शक्यता अतिशय दाट आहे. या शतकाच्या मध्यापर्यंत तापमान वाढीचा दर वाढतच जाणार आहे. अतिशय कडक उपाययोजनांचा वापर करूनसुद्धा पृथ्वीचे सरासरी तापमान दीड ते दोन अंश सेल्सियस जाण्याची शक्यता आहे. एवढ्या तापमानवाढीमुळेसुद्धा मानवाने कधीही न पाहिलेल्या वातावरणीय घटना पृथ्वीवर घडतील. 
    •  तपांबरामधील या तापमानवाढीचे मूळ कारण हरितगृह वायूंचे १९७९पासून होणारे उत्सर्जन आहे.
    • १९०१ ते २०१८ या कालावधीमध्ये महासागरांची सरासरी जलपातळी २० सेंटिमीटरने वाढली आहे. गेल्या तीन हजार वर्षांमध्ये समुद्रपातळी वाढण्याचा दर हा १९०० सालापासून सर्वाधिक आहे. समुद्र पातळी सुमारे तीन पट वाढली आहे. 
    • मानवी हस्तक्षेपाद्वारे वातावरणात सोडल्या गेलेल्या कार्बन-डाय-ऑक्‍साइडमुळे जगभरातील महासागरांचे आम्लीकरण झाले आहे. शिवाय महासागराच्या वरच्या भागातील ऑक्सिजनचे प्रमाणसुद्धा कमी होत आहे.
    • पृथ्वीच्या दोन्ही गोलार्धांमध्ये हवामानपट्टे ध्रुवांकडे सरकत आहेत. याचा परिणाम म्हणून चक्रीवादळेसुद्धा उच्च अक्षांशाच्या प्रदेशांकडे जात आहेत. 
    • सध्याचे वातावरणातील कार्बन डायॉक्साइडचे प्रमाण हे गेल्या दोन दशलक्ष वर्षांमधील सर्वाधिक आहे. तसेच मिथेन आणि नायट्रस ऑक्‍साईड या हरितगृह वायूंचे प्रमाण सुद्धा गेल्या ८ लाख वर्षांमध्ये सर्वाधिक आहे. १७५०पासून वातावरणातील कार्बन डायॉक्साइडचे प्रमाण ४७ टक्के तर  मिथेनचे प्रमाण १५६ टक्क्यांनी वाढले आहे. नायट्रस ऑक्साइड सुद्धा २३ टक्‍क्‍यांनी वाढला आहे.
    • उष्णतेच्या लाटा, पूर, चक्रीवादळ, दुष्काळ यांसारख्या आपत्तींची वारंवारिता आणि तीव्रता अतिशय वाढली आहे. शिवाय अतिवृष्टीसारख्या  टोकाच्या वातावरणीय घटनांची वारंवारितासुद्धा वाढली आहे.
    • उष्णतेच्या लाटा यांसारख्या उष्ण घटनांची वारंवारिता आणि तीव्रता वाढली आहे तर थंड घटनांची (थंडीच्या लाटा) तीव्रता आणि वारंवारिता कमी झाली आहे.
    • पृथ्वीवरील जलचक्राची तीव्रता येणाऱ्या काळामध्ये अतिशय वाढेल ज्यामुळे काही प्रदेशांमध्ये अतिवृष्टी तर असमान पर्जन्य पडल्यामुळे काही प्रदेशांमध्ये कोरडा दुष्काळ असेल. उच्च अक्षांशीय प्रदेश, उष्ण कटिबंधीय पॅसिफिक प्रदेश आणि मान्सून प्रदेश यांमध्ये पर्जन्याचे प्रमाण वाढेल. तर उपोष्ण कटिबंधीय प्रदेशात आणि काही उष्ण कटिबंधीय प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण कमी होईल. 
    •  समुद्र पातळीत वाढ झाल्यामुळे किनाऱ्यावरील प्रदेशांना विविध आपत्तींचा सामना करावा लागेल. अशा आपत्तींची वारंवारिता जी १०० वर्षांतून एक अशी होती ती प्रत्येक वर्षातून एक एवढी वाढेल. 
    • मागील चार दशकांपासून उष्णकटिबंधीय चक्रीवादळांचे प्रमाण वाढले आहे.
    • वातावरणातील तापमानवाढीसाठी महासागरांची तापमान वाढ ९१ % कारणीभूत आहे. समुद्रपातळी वाढण्यामध्ये या तापमानाचा ५० टक्के वाटा आहे. कारण तापमान जास्त झाल्यामुळे महासागरातील पाणी प्रसरण पावत आहे (Thermal Expansion). तर  वितळणाऱ्या हिमनद्यांचा समुद्रपातळी वाढण्यामध्ये २२ टक्के वाटा आहे.
    • १९९१पासून बर्फाच्या चादरी वितळण्याचे प्रमाण चार पटीने वाढले आहे. (मे महिन्यामध्ये अंटार्क्टिकापासून  दिल्लीपेक्षा आकाराने तीन पट मोठा असणारा जगातील सर्वात मोठा बर्फाचा तुकडा विलग झाला होता.) तसेच हिमनद्यांचे मागे सरकण्याचे प्रमाण वाढत आहे.
    • जगातील प्रमुख पर्वत रांगांमध्ये असणारा बर्फ वेगाने वितळत आहे. यामुळे हिमनद्या फुटणे, हिमदरड कोसळणे, अचानक पूर येणे यांसारख्या घटना वाढतील तसेच ऊर्जा उत्पादन, जलपुरवठा  या गोष्टींबाबत समस्या निर्माण होतील. 
    • आर्क्टिक समुद्रामधील बर्फ हा गेल्या दोन हजार वर्षांमधील सर्वाधिक जास्त दराने वितळत आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये आर्क्टिक महासागरातील सुमारे ४० टक्के बर्फ सध्या वितळत आहे. आर्क्टिक प्रदेश जागतिक तापमानवाढीच्या दरापेक्षा दुप्पट दराने गरम होईल. २०५० पूर्वी सप्टेंबर महिन्यामध्ये एकदा तरी संपूर्ण आर्क्टिक प्रदेश  हा बर्फ विरहित होण्याची शक्यता आहे. 
    • उष्ण कटिबंध आणि इतर प्रदेशांपेक्षा तापमान वाढीचा सर्वाधिक परिणाम ध्रुवीय प्रदेशांवर होत आहे.
    • बर्फाखाली गोठून असलेला पर्माफ्रॉस्ट वितळण्याचा दर वाढत आहे. या पर्माफ्रॉस्टखाली मोठ्या प्रमाणात मिथेन वायू  कोंडलेला आहे. तो वातावरणात मुक्त झाल्यास जागतिक तापमानवाढीच्या प्रक्रियेला आणखी गती येईल. 
    • प्रत्येक १००० गिगाटन कार्बन डायऑक्‍साईडच्या उत्सर्जनामागे पृथ्वीचे तापमान  सरासरी ०.४५ अंश सेल्सियस वाढते. १८५० ते २०१९ या काळामध्ये ते सुमारे २६०० गिगाटन कार्बन डायॉक्साइडचे उत्सर्जन मानवी प्रक्रियांद्वारे झाले आहे. 
    • कोविड महामारीच्या निर्बंधांचा परिणाम म्हणून २०२० मध्ये हवा प्रदूषणामध्ये तात्पुरती सुधारणा झाली होती. परंतु कार्बन डायॉक्साइडचे प्रमाण हे वाढतच  होते. 

आशिया आणि भारत :

  • इतर जगाच्या तुलनेमध्ये आशियातील समुद्राची पातळी जास्त प्रमाणात वाढली आहे. यामुळे भारतासह इतर आशियाई देशांच्या किनाऱ्यावरील सखल शहरांमध्ये पूरसदृश परिस्थितीची वारंवारिता वाढणार आहे.
  • हिमालय आणि तिबेटच्या प्रदेशांमध्ये हिमनद्या वितळतील व तेथील बर्फाचे प्रमाण कमी होईल. एकविसाव्या शतकामध्ये आशिया खंडात, तिबेटमध्ये आणि हिमालयात मॉन्सूनचे प्राबल्य वाढेल. परंतु मॉन्सूनची तीव्रता कमी जास्त असेल. म्हणजे एखाद्या वर्षी अतिशय जास्त पाऊस पडेल तर कदाचित त्याच्या पुढील वर्षी खूपच कमी पाऊस पडेल. 
  •  भारतामध्ये तीव्र उष्णता जाणवेल आणि उष्णतेच्या लाटांचे प्रमाण वाढेल.
  • इतर महासागरांच्या तुलनेत हिंदी महासागराची तापमान वाढ अधिक दराने झाली आहे. म्हणूनच भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर अलिकडच्या काळामध्ये आपल्याला चक्रीवादळांची संख्या जास्त दिसत आहे. 
  • काराकोरम पर्वतरांगांमधील हिमनद्या आकारमानामध्ये एकतर वाढल्या आहेत किंवा स्थिर राहिल्या आहेत. काराकोरम वगळता इतर सर्व पर्वतरांगांमधील हिमनद्या आणि बर्फ यांचे प्रमाण कमी होत आहे. 
  • हे सर्व परिणाम एकविसाव्या शतकामध्ये सुरूच राहणार आहेत. हवामान बदलाचा दर एकविसाव्या शतकामध्ये वाढतच जाणार आहे.
  • पृथ्वीमधील वातावरणीय प्रक्रिया या एकमेकांशी अतिशय क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या संबंधांनी  जोडलेल्या आहेत. वातावरणातील एका घटकामध्ये झालेला बदल हा वातावरणातील इतर घटकांवर दूरगामी परिणाम करतो. 
  •  हे परिणाम कमी करण्यासाठी अगोदरच प्रचंड उशीर झालेला आहे. तरी परिणामांची तीव्रता कमी  करण्यासाठी देशांना  अतिशय कडक उपाययोजनांचा  प्रभावी वापर करावा लागणार आहे. शून्य कार्बन डाय-ऑक्साइड उत्सर्जन क्षमता प्राप्त केल्यानंतर तापमानवाढ स्थिर होईल तसेच कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण नियंत्रणात राहील. परंतु जागतिक तापमान वाढीमुळे हवामानात असे अनेक बदल झाले आहेत जे अपरिवर्तनीय आहेत. समुद्र पातळीत वाढ आणि बर्फ वितळणं यासारखे इतर हवामानशास्त्रीय बदल येणाऱ्या अनेक दशकांसाठी तसेच सुरू राहतील.

Contact Us

    Enquire Now