५०% हून अधिक बालकांमध्ये प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) मुंबईच्या सेरो सर्वेक्षणाचा निष्कर्ष

५०% हून अधिक बालकांमध्ये प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) मुंबईच्या सेरो सर्वेक्षणाचा निष्कर्ष

 • मुंबई महापालिकेकडून बालकांमधील प्रतिपिंडाची (अँटीबॉडीज) चाचणी करण्यासाठी जाहीर झालेल्या सेरो सर्वेक्षणामध्ये मुंबईतील ५० टक्क्यांपेक्षा अधिक बालकांच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये कोविड – १९ प्रतिपिंडे आढळली आहेत.
 • सेरोचे हे चौथे सर्वेक्षण होते. १ एप्रिल ते १५ मे २०२१ सर्वच विभागात हे सर्वेक्षण केले गेले. त्यात मुलांमध्ये निम्याहून अधिकजणांमध्ये प्रतिपिंडे आढळलीत. म्हणजेच कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेतच अधिक बालकांना कोरोनाचा संसर्ग होऊन गेला आहे किंवा ते या विषाणूच्या सान्निध्यात आले आहेत.
 • तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पालिकेने केलेल्या सेरोलॉजिकल सर्वेक्षणातून हे निष्कर्ष समोर आले आहेत. तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक बाधा होऊ शकते असा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील लहान मुलांच्या रक्ताच्या नमुन्यांचे (सेरोलॉजिकल) सर्वेक्षण करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त इकबाल चहल आणि अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिले होते.
 • मागच्या तीन सेरो सर्वेक्षणाच्या तुलनेत चौथ्या सर्वेक्षणात प्रतिपिंडे असलेल्या लहान मुलांची संख्या जास्त आढळली असून ही बाब समाधानकारक आहे. नायर रुग्णालय आणि कस्तुरबा रुग्णालयातील सूक्ष्मजीव वैद्यकीय निदान प्रयोगशाळा यांनी हे सर्वेक्षण केले आहे.
 • मुंबईतील या चौथ्या सेरो सर्वेक्षणामध्ये ५१.१८ टक्के बालकांमध्ये प्रतिपिंडे आढळली. महानगरपालिकेच्या प्रयोगशाळेतील ५४.३६ टक्के तर खासगी प्रयोगशाळेतील ४७.०३ टक्के नमुन्यांमध्ये प्रतिपिंडे आढळली.
 • १ ते १४ या वयोगटामध्ये सर्वाधिक म्हणजे ५३.४३ टक्के बालकांमध्ये प्रतिपिंडे आढळली. या सर्वेक्षणाचा अभ्यास करून त्यातील निष्कर्ष मांडणी करण्यासाठी नायर रुग्णालयातील सूक्ष्मजीवशास्रज्ञ विभागाच्या गृह अधिकारी डॉ. गार्गी काकाणी यांनी मुख्य अन्वेषक तर सहमुख्य अन्वेषक म्हणून प्रा. डॉ. जयंथी शास्त्री यांनी काम सांभाळले.
 • या सर्वेक्षणासाठी मुंबईतील सर्व २४ प्रशासकीय विभाग मिळून एकूण २ हजार १७६ अनोळखी रक्त नमुने वेगवेगळ्या प्रयोगशाळांच्या माध्यमातून संकलित करण्यात आले.
 • मुंबईच्या २४ विभागांमध्ये १५ जुलैपासून आता पाचवी सेरो सर्वेक्षणाची फेरी सुरू होणार आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या किती टक्के लोकसंख्येमध्ये प्रतिपिंडे तयार झाली आहेत. याचा अभ्यास करण्यासाठीही फेरी असेल. बालकांचे सर्वेक्षण झाल्यामुळे त्यांचा यात समावेश केला जाणार नाही. या व्यतिरिक्त सर्व वयोगटातील व्यक्तींचा समावेश यामध्ये करण्यात येणार आहे.
 • प्रत्येक विभागातून सुमारे १५० असे सुमारे चार हजार नमुने या सर्वेक्षणात घेण्यात येतील, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

सेरो (SERO) सर्वेक्षण म्हणजे काय? :

 • सेरो म्हणजे ‘ब्लक किंवा रक्त’
 • या सर्वेक्षणामध्ये रक्ताच्या नमुन्यांची तपासणी केली जाते.
 • रक्तद्रव हा रक्ताच्या पिवळ्या रंगाचा घटक असून त्यामध्ये रक्तपेशी वगळता प्रथिने आणि अन्य घटक असतात.
 • या रक्तद्रवाची पाहणी केल्यावर कोणत्याही संसर्गजन्य रोगाविरोधात लढण्यासाठी तयार झालेल्या अँटीबॉडीजचा अंदाज येत असतो.

Contact Us

  Enquire Now