![](https://lms.chanakyamandal.org/wp-content/uploads/2021/08/dr.sadanand-more.jpg)
साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी सदानंद मोरे
- महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक आणि संत वाङ्मयाचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळाची पुनर्रचना करण्यात आली असून डॉ. श्रीधर ऊर्फ राजा दीक्षित यांच्याकडे अध्यक्षपद सोपवण्यात आले आहे.
- महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावर साहित्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या 29 सदस्यांना पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत नियुक्त करण्यात आले आहे.
- महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळावर विविध क्षेत्रांशी निगडित अध्यक्ष आणि 30 सदस्य अशा एकूण 31 सदस्यांची 5 मार्च 2019 च्या शासन निर्णयानुसार तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली होती.
- या मंडळाचे अध्यक्षा दिलीप करंबेळकर यांनी राजीनामा दिल्यानंतर पुनर्रचनेचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.
- त्यानुसार डाॅ. राजा दीक्षित यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून अध्यक्ष तसेच सदस्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल.
आसाराम लोमटे यांची निवड
- महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळावर साहित्यिक आणि लोकसत्ताचे परभणीचे बातमीदार आसाराम लोमटे यांचीही निवड झाली आहे.
- त्यांच्या ‘आलोक’ या कथासंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.
- त्यांच्या अनेक कथांचे कानडी आणि हिंदीत अनुवादही झाले आहेत.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
स्थापना – 19 नोव्हेंबर 1960
- मराठी भाषा, साहित्य, संस्कृती व कला या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रास लाभलेला थोर वारसा जतन आणि संवर्धन करण्यासाठी तसेच मराठी भाषेत विविध विषयांवरील मूलभूत संशोधन व प्रकाशन यांना उत्तेजन देण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने ही संस्था उभारली.
- मंडळाचे पहिले अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी होते.
- महाराष्ट्राची भाषा, संस्कृती, साहित्य आणि इतिहास तसेच विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, समाजविद्या यांच्या कक्षेत येणाऱ्या विषयांवर मराठीमध्ये ग्रंथरचना करणे हे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
- आधुनिक महाराष्ट्राच्या वाङ्मयीन गरजा लक्षात घेऊन सुरुवातीपासूनच मंडळ मौलिक व बहुविध वाङ्मयीन निर्मितीसाठी कार्यरत आहे.
- ज्ञान आणि संस्कृतीच्या विकासासाठी साधन स्वरूप व आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान यातील अद्ययावत प्रगतीची माहिती देणारी, मूलभूत ज्ञान देणारी पुस्तके व अभिजात ग्रंथ वाचकांना उपलब्ध करून देण्यासाठी मंडळाच्या वतीने 2015 सालापूर्वी प्रकाशित झालेली 444 पुस्तके इ-बुक स्वरूपात वाचकांना उपलब्ध करून दिली आहेत.