राष्ट्रीय हायड्रोजन मिशन
- भारत ग्रीन हायड्रोजनचे जागतिक केंद्र आणि सर्वात मोठा निर्यातदार बनण्यासाठी राष्ट्रीय हायड्रोजन मिशनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १५ ऑगस्ट २०२१ रोजी केली.
- उद्देश: स्वच्छ उर्जेत भारताला स्वावलंबी बनविणे आणि नवीन रोजगार निर्माण करणे.
- लक्ष्य: देशाने २०२२ पर्यंत १,७५,००० मेगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता गाठण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे.
- पार्श्वभूमी: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प २०२१-२२ मध्ये हरित ऊर्जा स्रोतांपासून हायड्रोजन निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय हायड्रोजन ऊर्जा अभियान (NHEM ) सुरू करण्याची घोषणा केली.
हायड्रोजनचे इंधन म्हणून महत्त्व:
- भारताची वीज कोळशावर अवलंबून आहे. प्रदूषण आणि तेलाच्या किंमतीतील वाढ लक्षात घेता हायड्रोजन जीवाश्म इंधनाची जागा घेईल.
- याचा वाहतुकीला (भारतातील हरितगृह-गॅस उत्सर्जनाच्या एक तृतीयांश योगदान) तसेच लोह-पोलाद आणि रसायन क्षेत्रात फायदा होईल.
- हरित (ग्रीन) हायड्रोजन तयार करताना पाण्याच्या विद्युत-विघटनासाठी जी ऊर्जा लागते ती पवन किंवा सौर ऊर्जेमार्फत मिळवली जाते. हा पुनर्निर्मितीक्षम ऊर्जेचा स्रोत आहे.
- हायड्रोजनपासून प्राप्त होणारी ऊर्जा पेट्रोलियमपेक्षा तिप्पट असून जास्त कार्यक्षम आहे. या तंत्राला ‘ग्रीन एनर्जी’ म्हणतात. राष्ट्रीय हायड्रोजन मिशनचा एक उद्देश म्हणजे हे तंत्रज्ञान आत्मसात करणे, हा आहे.
- २.२ पौंड (१ किलो) हायड्रोजन वायूपासून १ गॅलन (६.२ पौंड, २.८ किलोग्रॅम) गॅसोलीनच्या समान ऊर्जा प्राप्त होते.
- हायड्रोजनचे प्रकार:
अ) ग्रे हायड्रोजन:
- भारतात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.
- हायड्रोकार्बन (जीवाश्म इंधन, नैसर्गिक वायू) पासून मिळवतात.
- पूरक उत्पादन: CO२
ब) निळा हायड्रोजन:
- जीवाश्म इंधनांपासून मिळवले जाते.
- पूरक उत्पादन: CO, CO२
क) ग्रीन हायड्रोजन:
- अक्षय ऊर्जेपासून (सौर, वारा) निर्मिती.
- वीज पाण्यास हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये विभाजित करते.
- पूरक उत्पादन: पाणी, पाण्याची वाफ
- हायड्रोजन वायूची साठवणूक:
- हायड्रोजन भौतिकरीत्या वायू किंवा द्रव स्वरूपात साठवला जातो.
- हायड्रोजनचा उत्कलन बिंदू -२५२.८° सेल्सियस असल्यामुळे द्रव हायड्रोजन साठविण्यासाठी क्रायोजेनिक तापमान आवश्यक असते.
- हायड्रोजन घन पदार्थांच्या पृष्ठभागावर अधिशोषणाद्वारे (adsorption) किंवा घनामध्ये शोषणाद्वारे (absorption) साठवले जाऊ शकते.
धोरणात्मक आव्हाने:
- ग्रीन किंवा ब्लू हायड्रोजन काढण्याची आर्थिक परवड ही उद्योगांद्वारे हायड्रोजनचा व्यावसायिक वापर करण्यातील सर्वात मोठे आव्हान आहे.
- कार्बन कॅप्चर अँड स्टोअरेज (सीसीएस) आणि हायड्रोजन इंधन सेल तंत्रज्ञान यासारख्या हायड्रोजनचे उत्पादन आणि शोषण करण्यासाठी वापरण्यात येणारी तंत्रज्ञान अद्याप अधिक महाग आहेत. ज्यामुळे हायड्रोजनचा उत्पादन खर्च वाढतो.
- इंधन म्हणून आणि उद्योगांमध्ये हायड्रोजनचा व्यावसायिक वापर करण्यासाठी आर आणि डी, स्टोअरेज, वाहतूक आणि मागणी निर्मितीसाठी हायड्रोजनचे उत्पादन यासाठी तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय गुंतवणुकीची आवश्यकता असेल.