‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’ला ‘आयएसओ’चे प्रमाणपत्र
- प्रदूषण नियंत्रणाकरिता काम करणाऱ्या व संपूर्ण संगणकीकरणाच्या माध्यमातून कामकाजात सुधारणा करणाऱ्या ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला’ (MPCB) ‘आयएसओ’ या संस्थेने ISO 9000 : 2015 ने प्रमाणित केले आहे.
- राज्यामध्ये औद्योगिक आस्थापनांना सुलभ आणि तत्काळ सेवा मिळाव्यात म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे बहुतांश कामकाज ऑनलाइन पद्धतीने केले जाते. याची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी मंडळाने आपली कामकाज पद्धत ‘आयएसओ’कडे सादर केली होती. त्यावरील तपासणी करून ‘आयएसओ’ने हे प्रमाणपत्र दिले आहे.
- मंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव, सदस्य सचिव अशोक शिणगारे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे तांत्रिक सचिव पुंडलिक मिराशे, सांख्यिकी अधिकारी दिनेश सोनवणे यांनी सदर प्रमाणपत्र (मानांकन) मिळविण्याकरिता विशेष परिश्रम घेतले.
- संगणकीकरणाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या विविध सेवांसाठी मंडळाचे स्वयंपूर्ण असे माहिती केंद्र चालविले जाते. या माहिती केंद्राच्या सुरक्षा आणि राज्यभरातील कार्यप्रणालीस ‘आयएसओ’ने 2700 : 13 याने प्रमाणित केले आहे.
- ‘आयएसओ’कडून मिळालेल्या या दोन्ही मानांकनांमुळे भविष्यात मंडळाच्या सेवा गतिशील राखणे सहज शक्य होणार आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) :
महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणांतर्गत ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ कार्यरत आहे.
- हे मंडळ विविध विधीविधानांचे, मुख्यत्वे जल (प्रतिबंध व प्रदूषण नियंत्रण) अधिनियम, १९७४; हवा (प्रतिबंध व प्रदूषण नियंत्रण) अधिनियम, १९८१; जल (उपकर) अधिनियम, १९७७ यासह पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, १९८६ च्या अंतर्गत काही तरतुदींचे व त्या अंतर्गत तयार करण्यात आलेल्या जैव-वैद्यकीय टाकाऊ पदार्थ नियम, १९९८, हानिकारक टाकाऊ पदार्थ नियम २०००, महापालिका टाकाऊ घन पदार्थ नियम २०००, इत्यादीं सारख्या नियमांचे कार्यान्वयन करीत आहे.
- महाराष्ट्र जलप्रदूषण प्रतिबंध आधिनियम, १९६९ च्या तरतुदींनुसार ७ सप्टेंबर १९७० रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना झाली.
- जल (प्रतिबंध व प्रदूषण नियंत्रण) अधिनियम १९७४ च्या कलम ४ व हवा (प्रतिबंध व प्रदूषण नियंत्रण) अधिनियम, १९८१ च्या कलम ५ च्या तरतुदीअन्वये अध्यक्ष, सदस्य सचिव तसेच शासकीय व अशासकीय सदस्यांचा मंडळामध्ये समावेश आहे.
काही महत्त्वाची कार्ये (MPCB) :
- प्रदूषण प्रतिबंध, नियंत्रण किंवा बंदी आणि त्याची सुरक्षितता यासाठी व्यापक कार्यक्रमांची योजना करणे, प्रदूषण विषयक माहिती संकलन व प्रचार करणे.
- प्रदूषण नियंत्रण, टाकाऊ पदार्थांचे रिसायकल करून पुन्हा उपभोग घेणे, पर्यावरण अनुकूल पद्धती, इत्यादी क्षेत्रात होणाऱ्या विकासाला सहाय्य व प्रोत्साहन देणे.
- स्वच्छ व स्वस्थ पर्यावरणाविषयी सार्वजनिक जागरूकता निर्माण करणे तसेच प्रदूषणासंबंधी सार्वजनिक तक्रारींची दखल घेणे.