‘डीआरडीओ’च्या कोरोनाप्रतिबंधक औषधाला मान्यता
- संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) विकसित केलेल्या ‘२ डीऑक्सीडी ग्लुकोज’ (२-डीजी) या कोविड १९ प्रतिबंधक औषधाला भारताच्या औषध महानियंत्रकांनी (डीसीजीआय) आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे.
- हे औषध कोरोनाची सौम्य ते तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांवर सहाय्यक उपचार पद्धती म्हणून वापरले जाईल.
- ते तोंडावाटे घ्यावयाचे आहे.
- ‘२ डीऑक्सी-डी-ग्लुकोज’ (२-डीजी) हे औषध रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांना लवकर बरे होण्यास मदत करत असल्याचे, तसेच प्राणवायूच्या अतिरिक्त पुरवठ्यावरील त्यांचे अवलंबित्व कमी करत असल्याचे नैदानिक चाचण्यांमध्ये आढळून आले आहे.
- देश कोरोना महामारीच्या लाटेशी झुंजत असताना आणि यामुळे देशाच्या आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण पडला असताना या औषधाला मंजुरी मिळाली आहे.
- संसर्ग झालेल्या पेशींमध्ये हे औषध ज्या रीतीने कार्य करते, त्यामुळे ते अनेक मौल्यवान जीव वाचवण्याची अपेक्षा आहे.
- या औषधामुळे कोरोना रुग्णांचा रुग्णालयातील वास्तव्याच्या कालावधीही कमी होईल, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
- ‘२-डीजी’ हे औषध डीआरडीओतील आघाडीची प्रयोगशाळा असलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर मेडिसीन अँड अलाइड सायन्सेस (इन्मास) ने हैदराबाद येथील डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या साहाय्याने विकसित केले आहे.
- सहाय्यक उपचारपद्धती ही प्राथमिक उपचारांना मदत म्हणून वापरली जाते.
विषाणूवाढीला प्रतिबंध कसा होतो?
- ‘२-डीजी’ हे औषध पावडरच्या स्वरूपात येते. ते पाण्यात मिसळून घेतले जाते.
- विषाणूचा संसर्ग झालेल्या पेशींमध्ये ते जमा होते आणि विषाणूजन्य संश्लेषण व ऊर्जेचे उत्पादन थांबवून ते विषाणूच्या वाढीला प्रतिबंध करते.
- नेमक्या विषाणू संसर्गित पेशींमध्ये जमा होणे हे या औषधाचे वैशिष्ट्य आहे.
अतिरिक्त प्राणवायूवरील अवलंबित्व कमी
- रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांना लवकर बरे होण्यास हे औषध मदत करत असल्याचे, तसेच प्राणवायूच्या अतिरिक्त पुरवठ्यावरील त्यांचे अवलंबित्व कमी करत असल्याचे या औषधाच्या नैदानिक चाचण्यात आढळून आले आहे.
तीन टप्प्यांत चाचण्या
- ‘२ डीऑक्सी-डी-ग्लुकोज’ हे औषध रुग्णांचे प्राणवायूवरील अवलंबित्व कमी करत असल्याचे तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांतून स्पष्ट झाले आहे.
- पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांच्या समाधानकारक निकालानंतर केंद्रीय औषध महानियंत्रकांनी नोव्हेंबर २०२० मध्ये तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना परवानगी दिली होती.
- डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ या काळात दिल्ली, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, तेलंगाना, कर्नाटक आणि तमिळनाडूतील २७ कोविड रुग्णालयांमध्ये या औषधाची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी करण्यात आली.
- चाचण्यांच्या निकालामध्ये प्राणवायू पुरवठ्यावर असलेल्या रुग्णांचे त्यावर अवलंबित्व तिसऱ्या दिवसापासून कमी झाल्याचे दिसून आले.
सध्या केवळ रुग्णालयांनाच पुरवठा
- ‘डीआरडीओ’ तर्फे विकसित करण्यात आलेल्या या औषधाचे उत्पादन हैदराबादमधील डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीतर्फे केले जाणार आहे.
- सध्याच्या स्थितीत हे औषध केवळ रुग्णालयांना उपलब्ध करून दिले जाईल, कारण त्याचा आपत्कालीन वापर उपचारादरम्यान प्राणवायू पुरवठ्यावर असलेल्या रुग्णांसाठी केला जाणार आहे.
- कालांतराने डॉक्टरांच्या चिठ्ठीवर हे औषध दुकानांतून मिळण्याची शक्यता असल्याची माहिती डीआरडीओने दिली.