कार्बी – आंगलोंग शांतता करार
- आसामच्या प्रादेशिक अखंडतेची सुनिश्चिती करून या भागात अनेक दशके रेंगाळत असलेली बंडखोरीची समस्या सोडविण्याच्या हेतूने कार्बी-आंगलोंग शांतता करारावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत ४ सप्टेंबर २०२१ रोजी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
शांतता करारावर स्वाक्षरी करणारे बंडखोर गट :
अ) कार्बी लॉग्री पीपल्स डेमॉक्रॅटिक कौन्सिल
ब) कार्बी लॉग्री उत्तर काचर हिल्स लिबरेशन फ्रंट
क) युनायटेड पीपल्स लिबरेशन आर्मी
ड) कार्बी पीपल्स लिबरेशन टायगर्स
इ) कुकी लिबरेशन फ्रंट
कराराची ठळक वैशिष्ट्ये :
१) या करारामुळे १०० हून अधिक सशस्त्र कार्यकर्ते हिंसेचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडले गेले आहेत.
२) कार्बी भागाचा विकास करण्यासाठी विशिष्ट प्रकल्प राबविण्यासाठी केंद्र तसेच आसाम सरकार पाच वर्षांच्या कालावधीसाठी १००० कोटी रुपयांचे विशेष पॅकेज देणार आहे.
३) कार्बी आंगलोंग स्वायत्त मंडळाच्या (केएएसी) प्रदेशाव्यतिरिक्त इतरत्र स्थायिक झालेल्या कार्बी लोकांच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आसाम राज्य सरकार कार्बी कल्याण मंडळाची स्थापना करेल.
४) हा शांतता करार केएएसीला अधिक स्वायत्तता मिळेल तसेच कार्बी लोकांची विशिष्ट ओळख, भाषा, संस्कृती इत्यादींच्या संरक्षणाची हमी देतो.
५) आसामच्या प्रादेशिक तसेच प्रशासकीय अखंडतेला धक्का न लावता मंडळाच्या कार्यकक्षेतील प्रदेशाचा विकास साधण्यावर लक्ष केंद्रित करेल.
महत्त्व:
- १९८०च्या दशकाच्या उत्तरार्धापासून हत्या, वांशिक हिंसाचार, अपहरण आणि कर संकलन यांद्वारा तेथील (काब्री, आसाम) बंडखोरीचा इतिहास बघावयास मिळतो.
- या करारामुळे येथील हिंसाचाराचा अंत होऊन शांतता प्रस्थापित होईल, अशी आशा आहे.
- फेब्रुवारी, २०२१मध्ये सुमारे १००० कार्बी बंडखोरांनी आसाम सरकारसमोर आत्मसमर्पण केले होते.
- यापैकी जवळपास १५० जण जेथे कार्बी आगलोंग शांतता करारावर स्वाक्षरी केली जात होती त्या नॉर्थ ब्लॉकवर पोहोचले व त्यांच्यापैकी १५ जणांनी करारावर स्वाक्षरीही केली.
कार्बी कोण आहेत?
- कार्बी हा आसाममधील प्रमुख वांशिक समुदाय आहे.
- मूलत: ते ईशान्य भारतातील गटांपैकी एक असून कार्बी ॲगलॉग आणि दिमा हसाओ (उत्तर-पूर्व काचर) या डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राहतात.
कार्बी लोकांची मागणी?
- कार्बी संघटनांची मुख्य मागणी वेगळ्या राज्यनिर्मितीची होती.
- १९९० च्या उत्तरार्धात, कार्बी राष्ट्रीय स्वयंसेवक (केएनव्ही) आणि कार्बी पीपल्स फोर्स यांच्या एकत्रीकरणातून युनायटेड पीपल्स डेमोक्रॅटिक सॉलिडॅरिटीची (यूपीडीएस) स्थापना झाली.
- नोव्हेंबर २०११ मध्ये या संघटनेने आपले शस्त्र खाली ठेवण्याचा निर्णय घेतला व केंद्र आणि आसाम सरकारसोबत त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
- यामुळे अधिकची स्वायत्तता आणि कार्बी आंगलोंग स्वायत्त परिषदेसाठी विशेष पॅकेज देण्याचा तोडगा निघाला.
- कार्बी आंगलोंग स्वायत्त परिषद ही एक स्वायत्त जिल्हा परिषद असून तिला भारतीय संविधानाच्या सहाव्या अनुसूची अंतर्गत संरक्षण प्रदान करण्यात आले आहे.
ईशान्य भारतातील अलिकडे झालेले शांतता करार
अ) | नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा करार | १० ऑगस्ट २०१९ | भारत सरकार आणि त्रिपुरा |
ब) | ब्रू शांतता करार | २०२० | याअंतर्गत, भारत सरकार, त्रिपुरा आणि मिझोराम यांच्यात ब्रू स्थलांतरितांच्या प्रतिनिधींसह त्रिपुरातील ६९५९ ब्रू कुटुंबियांचे आर्थिक पॅकेजसह पुनर्वसन करण्यात आले. |
क) | बोडो शांतता करार | २०२० | भारत सरकार, आसाम सरकार आणि बोडो गटाच्या प्रतिनिधींमध्ये हा करार झाला, यात बोडोलँड टेरिटोरियल एरिया डिस्ट्रिक्ट (बीडीएटी) पुन्हा तयार करून त्यास बोडोलँड टेरिटोरियल रीजन असे नाव देण्यात आले आहे. |
मांडा म्हैस : ओदिशा
- नॅशनल ब्यूरो ऑफ ॲनिमल जेनेटिक रिसोर्सेस (NBAGR) या संस्थेने भारतात आढळणाऱ्या देशी म्हशीच्या जातींपैकी मांडा या म्हशीच्या जातीस १९वी अद्वितीय (Unique) जात म्हणून घोषित केले आहे.
- आढळ : ही जात मुख्यत: पूर्व घाट आणि ओदिशा राज्याच्या कोरापूट प्रदेशातील पठारी भागात आढळते.
- वर्णन : सामान्य रंग तपकिरी किंवा राखाडी असतो; डोळे तीक्ष्ण, तर शिंगे विस्तृत आणि अर्धगोलाकार असतात. त्यांची मान आणि पुढील पाय देखील लहान असतात परंतु चांगल्या विकसित छातीमुळे त्यांना आधार मिळतो.
वैशिष्ट्ये :
- ही परजीवी संसर्गास प्रतिरोधक, रोगांना कमी प्रवण आणि माफक स्रोतांवर भरपूर उत्पन्न देऊ शकते.
सरासरी दूध उत्पादन : एकावेळी २ ते २.५ लीटर
महत्त्व :
- ओदिशाच्या या अनोख्या जातीच्या आनुवंशिक संसाधनांचे संवर्धन करण्यासाठी आणि प्रजनन धोरणाद्वारे त्यांची उत्पादकता वाढविण्यासाठी राज्य आणि केंद्र प्रयत्न करतील.
- दूध, दही, तूप यांचे योग्य किंमतीत विपणन करण्यात सरकार मदत करेल. परिणामी, मूळ प्रदेशातील भागधारकांचे जीवनमान सुधारेल.
नॅशनल ब्युरो ऑफ ॲनिमल जेनेटिक रिसोर्सेस, कर्नाल:
- ही देशातील पशुधन आणि कुक्कुटपालनाच्या नव्याने ओळखल्या गेलेल्या जर्मप्लाझमच्या नोंदणीसाठी नोडल एजन्सी आहे.
पूर्वी एनबीएजीआर मान्यता प्राप्त जाती :
१) गुरे : बिंझारपुरी, मोटू, घुमूसरी, खारियार
२) म्हैस : चिलिका कालाहंडी
३) मेंढी : केंद्रापाडा
- भारतात गाईंच्या २६ आणि म्हशींच्या १६ जाती आढळतात.
काही महत्त्वाच्या जाती व त्यांचे आढळ क्षेत्र पुढीलप्रमाणे आहेत.
क्र | म्हैस | आढळ |
१) | मुऱ्हा | हरियाणा |
२) | सुरती | गुजरात |
३) | जाफराबादी | राजस्थान |
४) | मेहसाणा | गुजरात |
५) | भदावरी | आग्रा (उत्तरप्रदेश) |
६) | नागपुरी | नागपूर (वर्धा, यवतमाळ) |
७) | निलीरावी | पंजाब |
८) | पंढरपुरी | महाराष्ट्र (कोल्हापूर, सोलापूर, सातारा) |