आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधानाकडून M-YOGA ॲपची घोषणा
- सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित केले. जगभरही विविध कार्यक्रमांचे आयोजन करून हा दिवस साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने पंतप्रधानांनी ‘M-Yoga ॲप’ सुरू करीत असल्याची घोषणा केली.
- या ॲपद्वारे जगभरातील वेगवेगळ्या भाषांमध्ये योग शिकविला जाणार आहे. भारताने हे ॲप जागतिक आरोग्य संघटनेच्या सहयोगाने तयार केले आहे.
- या वेळी नरेंद्र मोदी यांनी योगा दिनाच्या शुभेच्छा देत म्हटले की, आज संपूर्ण जग कोरोनाच्या विरोधात लढत आहे. पण योग हा एक आशेचा किरण कायम टिकून आहे. दोन वर्षांपासून जगभरातील लोक देशात आणि भारतात जरी मोठे कार्यक्रम आयोजित करू शकत नसतील, पण या दिवसाच्या प्रति उत्साह कमी झालेला नाही.
- या ॲपमध्ये कॉमन योगा प्रोटोकॉलनुसार योग प्रशिक्षण देणारे अनेक व्हिडिओ असतील. हे व्हिडिओ जगभरातील अनेक भाषांमध्ये उपलब्ध होतील. या ॲपबद्दल मोदी म्हणाले; प्राचीन विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान यांच्या संगमाचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे हे ॲप आहे. आता जगाला ‘M-Yoga’ या ॲपची शक्ती मिळणार आहे.
- ‘M-Yoga ॲपमुळे योगाभ्यासाचा जगभरात प्रसार होण्यासाठी आणि ‘एक जग-एक आरोग्य’ मोहिमेतील सहभागासाठी मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.
- हे ॲप पूर्णपणे सुरक्षित असून यूझरच्या मोबाईलमधून कोणतीही माहिती गोळा करण्याचे काम ते करत नाही. १२ ते ६५ वर्ष वयाच्या व्यक्ती या ॲपचा रोजचा योग करणारा जोडीदार म्हणून वापर करू शकतात. योगाचा जगभर प्रसार व्हावा म्हणून या ॲपमध्ये योगासने कशी करावीत याची साध्या सोप्या भाषेत माहिती दिली जाईल.
- पंतप्रधान म्हणाले की, मला विश्वास आहे की योग लोकांच्या आरोग्यासाठी एक प्रतिबंधात्मक आणि महत्त्वाची भूमिका निभावेल.
आंतरराष्ट्रीय योग दिन :
- पंतप्रधान मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता.
- संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता.
- प्रस्तावावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली.
- २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.
२०२१ संकल्पना – ‘योगा फॉर वेलनेस’ : शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा विषय निवडण्यात आला.